वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 6 गुन्हे उघड, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
देहूरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 6 गुन्हे उघड, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत देहूरोड पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत देहूरोड पोलिसांनी एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत 6 मोटारसायकली आणि 1 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड आणि अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिमंडळ-4 चे पोलीस उपआयुक्त यांच्या आदेशानुसार देहूरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने दोन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली.
बिगर नंबर प्लेटमुळे संशय
दि. 15 जानेवारी रोजी पेट्रोलिंगदरम्यान देहूरोड हद्दीत बिगर नंबर प्लेट असलेली संशयास्पद मोटारसायकल आढळून आली. पोलिसांनी सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे नाव ईश्वर संदीप गजे (वय 22, रा. शिवाजीनगर, अकोले) असे आहे.
आणखी दोन आरोपी अटकेत
सखोल तपासात ईश्वर गजे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे साथीदार अनिकेत उर्फ छोट्या संतोष विटकर (वय 20, रा. विघ्नहर्ता, देहूगाव) आणि आर्यन उर्फ एस.पी. आनंद राऊत (वय 19, रा. माशी, भारतमाता चौक, गायकरवस्ती, आळंदी रोड) यांना अटक करण्यात आली. या तिघांकडून देहूरोड, तळेगाव दाभाडे, हिंजवडी आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 6 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून जप्त वाहनांची अंदाजे किंमत 5 लाख रुपये आहे. एका मोटारसायकलबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड
दरम्यान, आरोपी अनिकेत विटकर आणि आर्यन राऊत यांच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे पार पाडली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली किंवा वाहनचोरीसंदर्भातील माहिती आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन देहूरोड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा