त्याने मजुरीकरणाऱ्या महिलेकडे शरिरसुखाची केली मागणी तिच्या मुलाने त्याला कायमचा संपवला
बारामती
बारामतीं तालुक्यातील खांडज येथे आपल्या मजुरी करणाऱ्या आईकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एकाला तिचा मुलानं कायमच संपवलय.दगडाने ठेवून त्याचा खून केला असून त्याचा मृत देह विहिरीमध्ये टाकून दिला होता.मात्र माळेगावच्या पोलिसांनी कोणताही धागा दोरा नसतानाही कसुन तपास करत या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलाय.आपल्या आईकडे शरीर सुखाची मागणी केल्याने आपण त्याला कायमचा संपवला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. नवनाथ शिवाजी घोगरे तालुका मावळ आणि अनिल गोविंद जाधव तालुका रोहा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी मृत मारुती रोमन यांचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह खंडाज येथील एका विहिरीत हातपाय बांधून फेकून दिला होता.
याबाबत पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली माहिती अशी की,बारामती तालुक्यातील खांडज येथे दि.7 मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कांतीलाल सयाजी माने यांच्या विहिरीमध्ये राऊत वस्ती येथील मारुती साहेबराव रोमन यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर मार लागण्याच्या खुणा होत्या शिवाय त्याच्या मानेला साडी व दगड बांधलेला होता. या संदर्भात माळेगाव पोलीस ठाण्यात विजय मारुती रोमन रा.राऊतवस्ती खांडज यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथक तसेच इतर पोलीस अंमलदार यांची दोन पथके तपास कामी रवाना केलेली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना खाबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की मारुती रोमन ही घटना घडणेपुर्वी खांडज गावात मजुरी कामासाठी बाहेरुन आलेल्या लोकांसोबत फिरताना निदर्शनास आला होता. त्यानंतर पोलिसांनी ज्या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला त्यापासून जवळच असलेल्या पालांवरील नवनाथ शिवाजी घोगरे आणि अनिल गोविंद जाधव यांच्याकडे मारुती रोमन यांच्याबाबत चौकशी केली. या दोघांनीही सुरुवातीला पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र या दोघांवर पोलिसांचा संशय बळावला होता. यानंतर माळेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकातील महिला अंमलदार यांच्यामार्फत या दोघांच्याही कुटुंबातील महिलांकडे मारुती रोमन यांच्या बाबत चौकशी केली असता त्यांनी दिलेली उत्तरे आणि नवनाथ घोगरे व अनिल जाधव यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये पोलिसांना विसंगती आढळून आली.
पोलीस चौकशीतून खरी माहिती आली समोर
यानंतर चौकशी केलेले दोघेही पोलिसांपासून खरी माहिती लपवत असल्याची पोलिसांची खात्री पटली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी मारुती रोमन हा अधुन मधुन मजुरांचे खोपीवर येत जात होता, याच ओळखीतुन मारुती रोमन याने मजुरी काम करणारा अनिल जाधव याचे आईकडे शरीर सुखाचे मागणी केलेली होती, तो प्रकार त्या महिलेने तिच्या मुलाला सांगितला होता. याचा राग मनात धरून मारुती रोमन यांस विश्वासात घेवुन, परीसरातील निर्जन स्थळी नेवुन त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून करण्यात आला.
मयताची ओळख पटू नये म्हणून केला प्रयत्न
मयताची ओळख पटु नये म्हणुन त्याची कपडे काढुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ती कपडे पेटवून देण्यात आली. मारुती रोमन यांचा मृतदेह काही कालावधी करिता त्याच परिसरातील उसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आला आणि त्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मयत मारुती रोमन यांचे हातपाय बांधून त्यांचा मृतदेह पाण्याच्या वरती येऊ नये म्हणून साडीच्या साह्याने मोठ्या दगडाला बांधून तो विहिरीत टाकून देण्यात आल्याची कबुली या दोन्ही आरोपींनी माळेगाव पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी या दोन्ही आरोपींना माळेगाव पोलिसांनी अटक केली असून माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर हे करीत आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, अमोल खटावकर, तुषार भोर, सहा.पोलीस उपनिरीक्षक संजय मोहीते,पोलीस हवालदार सादीक सय्यद, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, महीला पोलीस हवालदार रुपाली धिवार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप, पोलीस कॉन्टेबल ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, अमोल कोकरे, विकास राखुंडे, जालींदर बंडगर, सागर पवार, महीला पोलीस कॉन्टेबल सुनिता पाटील यांनी केली.