भरदिवसा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; नीरा पोलिसांच्या ‘सर्जिकल नाकाबंदीत’ सुखरूप सुटका

 कापूरहोळ थरारलं! भरदिवसा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; नीरा पोलिसांच्या ‘सर्जिकल नाकाबंदीत’ सुखरूप सुटका



नीरा | ता. पुरंदर | पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसर मंगळवारी दुपारी अक्षरशः हादरला. एका नामांकित व्यापाऱ्याच्या अवघ्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि काही क्षणांतच भीतीचं सावट संपूर्ण परिसरावर पसरलं. मात्र, नीरा दूरक्षेत्र आणि जेजुरी पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे काही तासांतच या थरारक प्रकरणाचा सुखद शेवट झाला.

पांढऱ्या XUV700 मधून अपहरण; गावात खळबळ

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची (XUV700) MH 12 XE 5353 क्रमांकाची कार कापूरहोळमध्ये आली आणि क्षणात युवकाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पसार झाली. हा प्रकार इतक्या वेगात घडला की साक्षीदारही थक्क झाले. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना कळवले,  संबंधित मुलाच्या वडिलांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे कॉल करून लोकांकडे मदत मागितली होती. जेऊर मांडकी आणि निरा परिसरामध्ये हा कॉल केला गेला होता. त्यामुळे या भागातील स्थानिक लोक देखील सतर्क झाले होते. त्यांनी देखील पोलिसांना तातडीने मदत केली.

‘ऑपरेशन नाकाबंदी’ : जेऊर–निरा मार्ग सीलबंद

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी नीरा पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेऊर–निरा मार्गावर तातडीने नाकाबंदी उभारली. नीरा औटपोस्टचे पोलिस उपनिरीक्षक रविराज कोकरे, हरिश्चंद्र करे आणि प्रसाद कोळेकर यांनी कोणताही विलंब न करता कारवाई सुरू केली. शहरातील मुख्य चौकांबरोबरच त्यांनी स्वतः पुढाकार घेत शहरापासून सुमारे पाच किलोमीटर पुढे जाऊन अरुंद रस्त्यावर वाहन आडवे लावत अपहरणकर्त्यांचा मार्ग रोखला.

पाठलाग, वेग आणि उसाच्या शेतात अडकलेली कार

संशयित वाहन जेऊरकडून पिसुर्टीकडे जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. वाहन अडवण्याचा प्रयत्न होताच चालकाने वेग वाढवला. मात्र अरुंद रस्ता आणि घाईगडबडीत कार थेट उसाच्या शेतात घुसून अडकली. काही क्षणांतच परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले.

अपहरणकर्त्यांनी उसाच्या उंच पिकाचा फायदा घेत  घटनास्थळावरून पळ काढला; पण पोलिसांनी तत्परतेने कारमध्ये अडकलेल्या युवकाला बाहेर काढत त्याची सुरक्षित सुटका केली.



वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी; युवक सुखरूप

घटनेनंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. युवकाला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तो पूर्णपणे सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

“तात्काळ नाकाबंदी आणि समन्वयामुळे मुलाची सुरक्षित सुटका शक्य झाली. आरोपींचा शोध सुरू आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली.

कटामागे काय? तपास वेगात

अपहरणामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आर्थिक व्यवहारातील वाद, खंडणीचा प्रयत्न की वैयक्तिक वैर? या सर्व शक्यतांवर पोलिस तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि जप्त वाहनाच्या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



नीरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

या धाडसी आणि वेगवान कारवाईमुळे नीरा व परिसरातील नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तात्काळ निर्णय, स्वतः पुढाकार घेऊन उभारलेली नाकाबंदी आणि जीव धोक्यात घालून केलेली कारवाई यामुळेच युवकाची सुटका शक्य झाली, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

कापूरहोळ परिसराने सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी आरोपींच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांची पुढील कारवाई निर्णायक ठरणार आहे.

ग्रामसुरक्षा यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित 

मागील काही दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. अनेक गावांमधून ही यंत्रणा कार्यरत आहे. संकटाच्या वेळी किंवा मदत लागत असेल अशा वेळी या यंत्रणेवरून कॉल करून एकाच वेळी सगळ्यांना मदत मागता येते. याच यंत्रणेचा यावेळी देखील वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरातील लोकांना याबाबतची माहिती मिळाली आणि स्थानिक लोक सतर्क झाले. ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून संदेश दिल्यास एकाच वेळी तो त्याच गावात नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी असे अपहरण कर्ते किंवा चोरटे पळून जाण्याची शक्यता असते त्या त्या ठिकाणी, किंवा त्या मार्गावरील असणाऱ्या सर्व मोबाईलला हा  कॉल दिला जातो आणि त्यामुळे लोकांना याची मोठी  मदत होत असते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?