आचा-याने केला बलात्कार : तरुणीने मारली नदीत उडी
आचा-याने केला बलात्कार : तरुणीने मारली नदीत उडी
तीन दिवसानंतरही शोध लागेना : नराधम गजाआड
दि. 24
लग्न समारंभात जेवण बनवण्यासाठी गेल्यावर आचा-याने जबरदस्ती केली. त्याची माहिती घरी दिल्यावर पोलीसात तक्रार देण्यात आली. मात्र, या प्रकरणात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. पावसाच्या पाण्याने गढुळ होऊन वाहणाऱ्या भीमा नदीच्या प्रवाहात तिने स्वतःला झोकुन दिले. गेले तीन दिवस अल्पवयीन ‘ ती ‘ चा शोध सुरू आहे. शुक्रवारी ( दि .२३ ) पर्यंत तीचा तपास न लागल्याने एनडीआरएफने आपली शोध मोहिम थांबविली.
राजगुरुनगर जवळच्या चांडोली गावातील अल्पवयीन युवतीची ही करुण कहाणी समोर आली आहे. यातील आचारी आरोपीला खेड पोलिसांकडून अटक झाली आहे. मात्र तीन दिवस शोध घेऊनही तिचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफ च्या पथकाकडून तिचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, राजगुरुनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची ही चौथी घटना घडली आहे. केटरिंग व्यवसायात काम करताना सोबत आचारी काम करणा-या सचिन पांडुरंग पांडे (वय -२६ वर्ष, रा. राक्षेवाडी, राजगुरूनगर ) या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अत्याचाराची घटना घडल्या नंतर पीडित मुलगी तीन दिवस बेपत्ता आहे. तक्रार झाल्यावर तपास सुरू असताना पोलिसांना राजगुरुनगर – चांडोली येथील केदारेश्वर बंधा-यावर मुलीची ओढणी व चप्पल मिळुन आल्याने पिडित मुलीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे. तसेच परिसरात पाऊस पडत असल्याने नदीपात्रात गढुळ पाणी आले आहे. त्यामुळे तपासकार्यात अडथळे येत आहेत. सुरुवातीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र, काहीच हाती लागले नाही. शुक्रवारी ( दि २३) दोन टिमकडुन भिमा नदीवरील केदारेश्वर बंधा-यावर शोध मोहिम सुरु आहे.
पिडित बहिणीच्या तक्रारीवरुन राजगुरुनगर पोलीसांत सचिन पांडे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम आरोपीस अटक करण्यात आली आहे. तरीही पीडितेचा तपास सुरू असल्याने पोलिसांकडून त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पिडित तरुणीवर अत्याचार झाला. शिवाय तीन दिवसांनंतर मुलगी मिळुन न आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. खेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास आहेत.
Comments
Post a Comment