शिवतक्रारवाडी पिंपरे खुर्द शिवरस्ता होणार खुला : शेतकऱ्यांच्या उपोषणाला यश
विजय शिवतरे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण तात्पुरते स्थगित
नीरा दि. १६
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील शिवतक्रारवाडी आणि पिंपरे खुर्द या गावच्या सीमेवरून जाणारा शिवरस्ता खुला करावा. या मागणीसाठी नीरा येथील तीन शेतकऱ्यांनी काल गुरुवार पासून उपोषण सुरू केलं होतं. आज शुक्रवारी दुपारी आमदार विजय शिवतरे यांच्या मध्यस्थी नंतर हे उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांची मागणी प्रशासनाकडून मान्य करण्यात आली असून 21 मे पासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले आहे.
नीरा (ता. पुरंदर) येथील शिवतक्रारवाडी आणि पिंपरे खुर्द गाव यांच्या सीमेवर असणारा शिवरस्ता हा शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी बंद पडला आहे. यामुळे 200 ते 300 एकर शेत जमिनीत जाणारा रस्ता बंद झाला आहे. आपल्या शेतीच्या मशागतीसाठी जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषता ऊस तोडणीच्या वेळी ऊस वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता नसल्याने ऊस तोडीसाठी चार चार महिने थांबावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्याचे एकरी दहा ते वीस हजार रुपयांचे नुकसान होत आहे. या संदर्भात शिवतक्रारवाडी येथील शेतकरी महेश जेधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरंदर तहसील कार्यालयाकडे वारंवार हा रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. हा रस्ता खुला झाल्यास या भागातील शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी कोणाच्याही शेतातून जावं लागणार नाही. त्यामुळे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं होतं. शासनाचं धोरण शेतरस्ते आणि पानंद रस्ते खुले करण्याच असले तरी देखील याकडे प्रशासनाने फारसं लक्ष दिलं नव्हतं. अनेक वेळा मागणी करूनही सरकारने हा रस्ता खुला न केल्याने शेवटी महेश अर्जुन जेथे,शामराव आप्पासो धायगुडे, दत्तात्रय आप्पासो धायगुडे यांनी गुरुवारी सकाळपासून नीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यानंतर तहसीलदारांनी मध्यस्थी करत हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र जेधे यांनी रस्त्याचे काम सुरू केल्यानंतरच उपोषण मागे घेतो असं ठामपणे सांगितलं होतं. मात्र यानंतर आज शुक्रवारी पुरंदरचे आमदार विजय शिवतरे यांनी महेश जेधे आणि यांच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधून भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी संपावर असून त्यामुळे तातडीने मोजणी करता येणार नाही. त्यामुळे 21 मे पासून या रस्त्याचं काम सुरू करण्यात येईल अस आश्वासन दिले. तहसीलदारांनी देखील त्यांना याबाबतच आश्वासन दिले आणि यानंतर या तीनही शेतकऱ्यांनी आपलं उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.