"जनसागराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही", राजगड तालुक्यातला सुनेत्रा पवारांचा दौरा चर्चेत
बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना काल वेगळाच प्रचारादरम्यान अनुभव आला. काल सुनेत्रा पवार या प्रचारासाठी राजगड तालुक्यातील वडगाव झांजेमध्ये पोहचल्या असता त्यांचा गावाच्या वेशीवरच प्रचंड उत्साहाने गावकऱ्यांनी स्वागत केले. गावच्या वेशापासून सुमारे अर्धा किलोमीटर आत गावापर्यंत रांगोळ्यांच्या अंथरलेलया पायघड्या. गावातील तमाम ज्येष्ठ मंडळीनी तरूणांसह धरलेला लेझिमचा डाव, युवकांचे ढोल पथक आणि प्रत्येक घरातील माता भगिनींनी माझे केलेले औक्षण अशा अफाट उत्साहात सुनेत्रा पवार यांचं स्वागत करण्यात आलं.
यातच सुनेत्रा पवार यांची पदयात्रा या अशा मिरवणुकीने भैरवनाथ मंदिरासमोर पोहोचली आणि लेझीमचा डाव टिपेला पोहोचला. त्याने वातावरण एवढे भारून गेले की पुणे जिल्हा कात्रज दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, जिल्हा सरचिटणीस अर्जून भिलारे, वेल्हे खुर्दचे सरपंच प्रकाश जेधे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी लेझीमच्या डावावर ताल धरला.
तर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे आणि मोनिका बांदल यांनाही राहावले नाही. त्या दोघींनी या जल्लोषात सहभागी होऊन फुगडी घातली. साऱ्या गावात जणू दसरा दिवाळीचा माहोल तयार झाला होता. याच माहोलात घड्याळाचा गजर करून महायुतीच्या विजयाचा निर्धार करण्यात आला. भोर राजगड मुळशी विधानसभा मतदार संघातील राजगड, तोरणा या गडकोटांच्या कुशीत राजगड तालुक्यात पार पडलेला संपर्क दौरा म्हणजे महायुतीच्या विजयाची मिळालेली ग्वाही अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली.
या दौऱ्याची सांगता वडगाव झांजेमध्ये झाली ती अशा भक्कम, जल्लोषी, उत्स्फूर्त प्रतिसादाने झाली. राजगड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष दामगुडे यांनी प्रास्ताविकात देशहित जपत विकासाच्या पाठीशी सारा राजगड तालुका घड्याळाच्या पाठीशी एकवटल्याचे सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब देशमाने, संदीप खुटवड, विकास नलावडे, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, शैला दारवटकर, संगीता जेधे स्थानिक ग्रामस्थ सत्यवान दामगुडे ,दिनकर झांजे, किसन झांजे, पांडुरंग झांजे, शंकरराव दामगुडे, बापूसाहेब आलगुडे, तानाजी झांजे, किरण पानसरे, दशरथ झांजे, माऊली झांजे, काशिनाथ झांजे, अलका झांजे, हर्षदा झांजे, रुपाली झांजे, ज्योती दामगुडे, तानाजी झांजे, विठ्ठल झांजे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व ग्रामस्थांनी महायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले. आपुलकीने सन्मान केला. निर्धारपूर्वक प्रचंड मताधिक्याने विजयाची ग्वाही दिली. त्याबद्दल या साऱ्या साऱ्यांचे सुनेत्रा पवार यांनी मनापासून आभार मानले. तर संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची प्रचिती आजच्या राजगड तालुका दौऱ्यातही सुनेत्रा पवार यांना आली. जनसागराच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनसंपर्कासोबत राज्य आणि केंद्र शासनाचा माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी कटिबद्ध राहीन. हा माझा शब्द. देखील यावेळी सुनेत्रा पवार यांनी गावकऱ्यांना दिला.