Sunday, October 29, 2023

नीरा येथे गुरुवारी रस्ता रोको : जरांगेंची तब्बेत खालावल्याने मराठा समाज आक्रमक

   नीरा येथे  गुरुवारी रस्ता रोको : जरांगेंची तब्बेत खालवल्याने मराठा समाज आक्रमक 



    नीरा दि.३०


             मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नीरा येथे गुरवारी सकाळ पासून पुणे पंढरपूर मार्गावर रस्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे.तत्पूर्वी उद्या मंगळवार पासून ग्रामपंचायत कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.आज सोमवारी नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात मराठा समाजाची एक बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.


           मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्बेत खालावली असल्याने आता मराठा समाज हवाल दिलं होताना पाहायला मिळतो आहे. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. जरांगे यांना जर काही झाले तर काय ? अस प्रश्न आता सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात येत आहे. सरकारला जरांगे यांना मारायचे आहे काय ? असा सवाल लोकांनी व्यक्त केला आहे.सत्ताधारी आणि विरोधक या दोघां विरोधात आता मराठा तरुण आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत.नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्व पक्षातील मराठा बांधव उपस्थित होते. गरज पडल्यास आपापल्या राजकीय पक्षाचा राजीनामा देण्याबाबतही यामध्ये चर्चा करण्यात आली. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. जर कोणत्या मराठा नेत्याला आरक्षणाची गरज नसेल तर आरक्षण घेऊ नका.पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नका. असा इशारा यावेळी देण्यात आला. रामदास कदम व नारायण राणे यांनी केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी नीरा, निंबुत,राख, गुळूंचे,जेऊर, पिंपरे खुर्द, थोपटेवाडी,मांडकी या भागातील लोक  बैठकीला उपस्थित होते.

   तर या रस्ता रोको आंदोलनात सर्वच जातीच्या लोकांनी सहभागी व्हावे आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. तर कोणत्याही राजकीय नेत्याने गावात येऊ नये.

Friday, October 27, 2023

सह्याद्री एक्स्प्रेस पुण्यापर्यंत सुरू ५ नोव्हेंबर पासून धावणार : पुण्यात पोहचणार सकाळी..

 सह्याद्री एक्स्प्रेस पुण्यापर्यंत सुरू

५ नोव्हेंबर पासून धावणार : पुण्यात पोहचणार सकाळी...




पुरंदर : कोव्हिड काळात रेल्वे बंद झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर गेली दोन वर्षांत सह्याद्री एक्स्प्रेस बंद होती. वेळोवेळी रेल्वे प्रशसनाला पत्रव्यव्हार करुनही प्रतिसाद मिळत नव्हता. नुकतेच पुणे विभागीय रेल्वे बोर्डाच्या बैठकीत सह्याद्री एक्स्प्रेस बाबत निर्णय घेण्यात आला आहे.

     कोल्हापूर ते मुंबई दरम्यान रात्री धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईत सकाळी अकराच्या सुमारास पोचत असे. सायंकाळी सहा वाजता पुन्हा कोल्हापूरकडे रवाना होत असे. ही गाडी मुंबईकडे जाण्यासाठी नीरा शहरात पहाटे साडेचार वाजता येत असे व मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास येता ये होती. यामुळे नीरा शहरासह पुरंदर, बारामती, फलटण, खंडाळा तालुक्यातील शंभर गावातील व्यावसायिक, नोकरदार यांना मुंबईला जाऊन यायला सोईची होती. दिवसभराचे काम करुन पुन्हा नीरेत येता येत होते. पण गेली दोन वर्षांपासून ही गाडी बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.

  आता पुन्हा सह्याद्री एक्स्प्रेस (गाडी क्र. १०२३/१०२४) नव्या वेळेत सुरु केली आहे, पण ती कोल्हापूर - पुणे दरम्यान धावणार असल्याने प्रवाशांनी काहीसे समाधान व्यक्त केले आहे. ०५ नोव्हेंबर पासून सह्याद्री एक्स्प्रेस कोल्हापूर येथून रात्री ११:३० वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे. मिरज ००:३५, कराड ०२:०७, सातारा ०३:५७, नीरा ०५:१३, पुणे ०७:४५ येथे पोहोचेल. पुणे येथुन रात्री रात्री ०९:४५ वाजता कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. नीरा येथे ११:१४, सातारा ००:२२, कराड ०१:३५, कोल्हापूर येथे ०५:४० वाजता पोहोचेल. 

Wednesday, October 25, 2023

पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध

 पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध 




पुरंदर तालुक्यात तीन ग्रामपंचायती बिनविरोध


सासवड (पुढारी वृत्तसेवा) ता २५ : पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. बुधवारी (दि.२५) अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी वाल्हे, सुकलवाडी, आडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे.


      आज आर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी वाल्हे आणि सुकलवाडी ग्रामांचायातीसाठी सरपंच व सदस्य पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवाराचा अर्ज शिल्लक राहिला.तर इतर उमेदवारांनी आपले आर्ज माघारी घेतले.त्यामुळे वाल्हे आणि सुकलवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिन विरोध झाली तर  आडाचीवाडी ग्रामपंचायतीसाठी विरोधात उमेदवारी अर्ज भरण्यात आले नव्हते त्यामुळे ही ग्रामपंचायती बिनविरोध झाली आहे.



           वाल्हे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी अतुल सोमनाथ गायकवाड यांनी  बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर सदस्यपदी तेजस बाळासाहेब दुर्गाडे, मयुरी संदीप भुजबळ, साम्राज्ञी सचिन लंबाते, अनिल राजाराम भुजबळ, अमित धनंजय पवार, पूर्वा राजेंद्र राऊत, कविता सतिश पवार, सागर मदन भुजबळ, प्रमिला नवनाथ पवार, हरी प्रल्हाद दुबळे, अमोल शंकर पवार, शितल दादा मदने, वैशाली दादासाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्याच बरोबर   सुकलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी संदेश पवार यांची  बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  दर सदस्य म्हणून  प्रतीक्षा भाऊसाहेब चव्हाण, योगेश मारूती पवार, ऊर्मिला दिलीप पवार, नितीन महादेव गावडे,  हर्षदा नितीन पवार, वैजयंती दत्तात्रेय दाते, अमोल अरूण पवार, दत्तात्रेय किसन पवार, अश्विनी कुंडलिक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.

         आडाचीवाडी ग्रामपंचायतीची निवडणुकाही  बिनविरोध झाली असून विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीसाठी विरोधात अर्ज भरण्यात आलेच नव्हते. त्यामुळे  सुवर्णा बजरंग पवार, यांची सरपंच म्हणून निवड झाली आहे तर  शकुंतला महादेव पवार, सुजाता विजय पवार, विद्या मच्छिंद्र पवार, लता बाळु पवार, प्रतिभा राहुल पवार, विकास अशोक पवार, अलका दिलीप पवार, मोहन निवृत्ती पवार, ज्ञानदेव भाऊसो पवार यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.



    तर तालुक्यात सध्या आणखी १२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे. यासाठी  रविवारी (दि.५) नोव्हेंबर रोजी ममतदान प्रक्रिया पार पडणार असून  सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान करता येणार आहे. सोमवार (दि.६) नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन  निकाल जाहीर होईल.

गुळूंचे व कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या रिंगणात किती उमेदवार व कोण. उद्या पासून प्रचाराची रणधुमाळी सुरू.

 गुळूंचे व कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या रिंगणात किती उमेदवार व कोण.


उद्या पासून प्रचाराची रणधुमाळी सुरू.





पुरंदर :
       पुरंदर तालुक्यातील गुळूंचे व कर्नलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या निवडणुकीसाठी थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार आहे. सात सदस्यांच्या जागांसाठी ३३ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले होते. आज बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठीचे १८ अर्ज व सरपंचपदासाठीचे ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता सदस्य पदासाठी १५ व सरपंच पदासाठी दोन अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

श्री. ज्योतिबा ग्रामपरिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सुवर्णा तानाजी महानवर. प्रभाग क्रमांक १ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण दिपक रामचंद्र भोसले, सर्वसाधारण महिला राखीव आशा सचिन चव्हाण, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव प्रतिक्षा रामचंद्र गदादे. प्रभाग २ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण नंदकुमार वसंतराव निगडे, सर्वसाधारण महिला राखीव स्वप्नाली विराज निगडे. प्रभाग ३ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण अरविंद गुलाबराव निगडे, सर्वसाधारण महिला राखीव अनिता जगन्नाथ कर्णवर.

      ज्योतिबा ग्रामविकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार अहिल्याबाई शंकर वाघापुरे. प्रभाग क्रमांक १ मधुन सदस्य पदासाठीचे सर्वसाधारण जागेसाठी अनिल गणपत निगडे, सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी प्रियंका रणजीत निगडे, नागरिकांचा मागासप्रवर्ग प्रतीक्षा सागर महानवर. प्रभाग क्रमांक २ मधुन सर्वसाधारण अशोक ज्ञानेश्वर निगडे, सर्वसाधारण महिला राखीव जागा अनिता सत्यवान निगडे. प्रभाग क्रमांक ३ मधुन सर्वसाधारण कपिल मारुती कोंडे, सर्वसाधारण महिला राखीव अलका अरविंद कर्णवर.

      कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधुन सर्वसाधारण जागेसाठी मेघराज सुधाकर निगडे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत
  
गुळूंचे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ सदस्यांच्या जागांसाठी ३९ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ८ उमेदवारी अर्ज आले होते. आज बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठीचे २० अर्ज व सरपंचपदासाठीचे ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता सदस्य पदासाठी १९ व सरपंच  पदासाठी ३ अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

   गुळूंचे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निर्मला उत्तम निगडे, सम्राज्ञी कौस्तुभ निगडे व सीमा विजय निगडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग १ मधुन सदस्य पदासाठी नागरिकांचा मागासवर्ग महिला शितल शेखर कर्णवर, पौर्णिमा महेश गायकवाड, सर्वसाधारण महिला हेमलता हणुमंत निगडे, वंदना सोमनाथ मुळीक, सर्वसाधारण किरण प्रल्हाद निगडे, दिपक आनंदराव निगडे. प्रभाग २ मधुन अनुसूचित जाती नितीन जयंत गायकवाड, ज्ञानेश्वर शंकर पाटोळे, सर्वसाधारण महिला कविता शंकर निगडे,  रेश्मा तानाजी निगडे, सर्वसाधारण अक्षय विजय निगडे, गणेश नथुराम निगडे, तानाजी बजाबा निगडे. प्रभाग ३ मधुन नागरिकांचा मागासप्रवर्ग निखिल उत्तमराव खोमणे, वैशाली राजेंद्र फरांदे, सर्वसाधारण महिला राखीव अमृता नितीन निगडे, आरती भगीरथ निगडे, मनिषा अनिल निगडे, वैशाली राजेंद्र निगडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

   गुरवार (दि. २६) पासुन निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. रविवार (दि.०५) रोजी मतदान होणार आहे तर सोमवार (दि.०६) रोजी सासवड येथे मतमोजणी होणार आहे. 

Saturday, October 21, 2023

नीरा येथे अंगावरून ट्रक केल्याने ७८ वर्षीय जेष्ठ नागरिकांचा मृत्यू

 नीरा येथे अंगावरून ट्रक गेल्याने ७८ वर्षीय जेष्ठ नागरिकांचा मृत्यू




पुरंदर :
       पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज शनिवारी अडीच वाजलेच्या सुमारास बस स्थानकासमोर एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने मृत्यू झाला आहे. बाबासाहेब संतराम मरकड अस त्यांचं नाव असून ते जेजुरी येथील रहिवाशी आहेत.
     
     याबाबत प्रत्यक्षदर्षी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार मरकड हे चालत पुणे पंढरपूर रस्त्याने नीरा बस स्थानकाकडे चालले होते. ट्रक क्रमांक एम. एच. १२- इ.एफ.९१५७ या ट्रकची त्यांना धडक बसली. त्यामुळे ते चाका खाली गेले यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. नीरा येथील पोलिस हवालदार संदीप मदने, निलेश जाधव, होमगार्ड बरकडे व स्थानिक युवकांनी यावेळी मदत करून या व्यक्तीचा मृतदेह प्रहारच्या रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. यासंदर्भात अधिकचा तपास जेजुरी पोलीस करीत आहेत. दरम्यान ट्रक चालक ट्रकसह नीरा पोलीस चौकीत हजर झाला आहे.

पुरंदर तालुक्यात १५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ७३ अर्ज. १३५ सदस्यांसाठी ४१२ अर्ज. एक ग्रामपंचायती बिनविरोध.

 पुरंदर तालुक्यात १५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ७८ अर्ज. १३५ सदस्यांसाठी ४१२ अर्ज.

एक ग्रामपंचायती बिनविरोध.




पुरंदर :

        पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. शुक्रवारी (दि.२०) अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३५ सदस्यांच्या जागांसाठी ४१२ अर्ज आले तर पाच ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागली आहे. यासाठी ८ अर्ज आले आहेत. १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावेळी सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार आहे. सरपंच पदासाठी तब्बल ७३ अर्ज आल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी (दि.२५) अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

      पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ९ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी १ उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. गुळुंचे ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्याच्या जागांसाठी ३९ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ८ उमेदवारी अर्ज आले आहेत, कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या सात सदस्याच्या जागांसाठी ३३ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले आहेत, वाल्हा ग्रामपंचायतीच्या १३ सदस्याच्या जागांसाठी ३८ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले आहेत, वागदरवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी २० अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले आहेत, आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ९ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी १ उमेदवारी अर्ज आले आहेत, सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी २० अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले आहेत, वनपुरी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी २६ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज आले आहेत, उदाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज आले आहेत, कोथळे ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ३१ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ९ उमेदवारी अर्ज आले आहेत, रानमळा ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी २१ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले आहेत, भोसलेवाडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले आहेत, वीर ग्रामपंचायतीच्या १५ सदस्याच्या जागांसाठी ६० अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ११ उमेदवारी अर्ज आले आहेत, माळशिरस ग्रामपंचायतीच्या ११ सदस्याच्या जागांसाठी ४७ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज आले आहेत, राजुरी व एखतपुर-मुंजवडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी २ उमेदवारी अर्ज आले आहेत. पाच गावच्या प्रत्येकी एक सदस्यांसाठी पोट निवडणूक होणार आहे. नायगाव व पानवडी येथे १ अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. पांढे व राख येथे ३ अर्ज आले आहेत. सुपे खुर्द येथील एका जागेसाठी एक ही अर्ज आला नाही.

    निवडणूक अर्जांची छाननी सोमवारी २३ ऑक्टोबरला होईल. बुधवारी २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. बुधवारी २५ ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान रविवारी ५ नोव्हेंबर रोजी असणार आहे. सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर सोमवार ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होईल.

Monday, October 16, 2023

गुळूंचे ग्रा.पं. ची निवडणूक होणार पुन्हा रंगतदार; उमेदवारांसोबत मतदारांची देखील मतदानावेळी परीक्षा

 गुळूंचे ग्रा.पं. ची निवडणूक होणार पुन्हा रंगतदार; उमेदवारांसोबत मतदारांची देखील मतदानावेळी परीक्षा







पुरंदर :
      पुरंदर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या गुळूंचे ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, गाव नेत्यांची निवडणुकीसाठीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असून ते सर्वसाधारण महिला राखीव असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

      २ हजार ६०० मतदार असलेल्या गुळूंचे गावात तीन प्रभाग असून प्रत्येकी तीन सदस्य संख्या असून थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. दोन्ही गटांना आपापल्या पॅनेलला उमेदवार मिळवण्यासाठी जय्यत तयारी असून, पॅनेल पूर्ण ताकदीने उभे करण्याकडे गावनेत्यांचा कल आहे. त्यामुळे कोणाचा कसा पॅनेल असणार, कोण उमेदवार असणार व सरपंचपदासाठी कोणकोणते उमेदवार असणार यावर निवडणूक व प्रचार काळात वारे वाहणार आहेत.

     येथील गावनेत्यांनी गावपातळीसह वेगवेगळ्या राजकारणात सहभाग घेतलेला आहे, तसेच गावात पर्वीपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. गुळूंचे गावाला दोनदा पुरंदर पंचायत समितीचे सभापती पद मिळाले होते. तर मागील काळात सांसद आदर्श ग्राममध्ये गावाचा समावेश होता. सध्या सोमेश्वरचे  संचालक पदी गावातील युवक नेतृत्व करत आहेत. त्यामुळे निवडणूक कशी रंगतदार करायची, कोणाचे नाक दाबल्यावर कोणाचे कसे तोंड उघडते हे राजकारणातील डावपेच सर्वांनाच माहीत आहेत. त्यामुळे सध्या सर्वजण निवडणुकीसाठी चांगला सर्वसमावेशक पॅनेल कसा देता येईल याकडे लक्ष देत आहेत.

       गुळूंचेत आमदार संजय जगताप समर्थक पॅनेल, तर माजी सभापती अजित निगडे समर्थक यांचा पॅनेल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आ. जगताप समर्थक प्रा.उत्तम निगडे, युवक काँग्रेसचे नितीन निगडे, पोपटभाऊ निगडे, महिला आघाडीच्या नेत्या वैशाली निगडे तसेच इतर पदाधिकारी यांचा एक पॅनेल असणार आहे, तर सभापती निगडे समर्थक पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित निगडे, सोमेश्वरचे संचालक जितेंद्र निगडे, दिपक निगडे, माजी सरपंच संतोष निगडे तसेच इतर पदाधिकारी यांचा एक पॅनेल असणार आहे. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रसचे आमदार संजय जगताप समर्थक व माजी सभापती अजित निगडे समर्थक हे दोन पॅनेल समोरासमोर असल्याची गावात जोरदार चर्चा सुरू आहे.

चौकट १)
तयारीतील युवक झाले एकदम शांत

      मागील काळात गावातील एका विषयावर युवकांनी एकत्रित येत गावनेत्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्या वेळी युवकांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल उभा करण्यासाठी बैठकादेखील घेतल्या होत्या. मात्र, निवडणूक जाहीर झाली आणि काही दिवसांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आली असून, या युवकांच्या गटात शांतता दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेले युवक सध्या शांत का? का ही वादळा पुर्वीची शांतता आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

चौकट २)
रात्रीस खेळ चाले

    सध्या मोठ्या गावनेत्यांकडून पॅनेलसाठी उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, एखादा कार्यकर्ता आपल्याला निवडणुकीत वरचढ होऊ शकतो असे वाटले तर यासाठी अशा ठरलेल्या संभाव्य उमेदवाराच्या घरी रात्रीच्या वेळी जाऊन त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दडपण टाकले जात आहे. याच दरम्यान गुलाल, भंडाऱ्याच्या आणाभाका घातल्या जात असल्याची देखील चर्चा सुरू आहे

जेऊर येथे झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या

 जेऊर येथे झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या



नीरा  दिनांक १६

पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. बापूराव मुरलीधर तांबे वय ४२ वर्षे रा. जेऊर ता पुरंदर अस या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे .त्यांनी जेऊर येथील त्यांच्या स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. आत्महतेचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास नीरा पोलिस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप मोकाशी करत आहे

त.

Friday, October 13, 2023

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा ग्रामीण पत्रकारांशी संवाद, सेलू पत्रकार संघाचा पुढाकार

 मराठी पत्रकार परिषदेचे  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा ग्रामीण पत्रकारांशी संवाद, सेलू पत्रकार संघाचा पुढाकार 





मुंबई : महाराष्ट्र राज्यातील पहिली व सर्वसमावेशक राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न सेलू तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा परभणी यांच्या वतीने 11 ऑक्टोबर 2023 रोजी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सेलू येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी उपस्थित सर्व पत्रकारांसोबत दिलखुलास संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन करत येणाऱ्या भविष्य काळात प्रसार माध्यमामध्ये डिझीटल मीडिया हे माध्यम कसे प्रभावी ठरणार आहे, या बद्दल माहिती दिली.   

                                                          तसेच  साप्ताहिक, ज्येष्ठ पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य विमा, पत्रकारांवर वाढते हल्ले, अशा अनेक पत्रकारांच्या निगडित असलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. 


      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, बीड उपाध्यक्ष रवी साबळे, डिझीटल मीडिया परिषद राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण मानोलीकर, परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रभू दिपके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुधाकर श्रीखंडे, महानगर अध्यक्ष दत्तात्रय कराळे, महानगर सहसचिव तथा डिझीटल मीडिया परिषद परभणी प्रमुख प्रमोद अंभोरे, प्रेस फोटोग्राफर संजय घनसावंत आदींची विशेष उपस्थिती होती. तसेच संवाद मेळावा यशस्वी करण्यासाठी शेख मोहसीन, नारायण पाटील, मोहमद इलियास,  किशोर कटारे, निसार पठाण, पुनमचंद खोना, रामेश्वर बहिरट, शिवाजी शिंदे, कांचन कोरडे, दिलीप मोरे, डॉ.विलास मोरे, सतीश आकात, राहुल खपले, निसार पठाण आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची प्रास्तविक शेख मोहसीन यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी व आभार निसार पठाण यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, October 8, 2023

साप्ताहिकांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू राहणारच : एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत विविध विषयांवर झाले विचारमंथन

 साप्ताहिकांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू राहणारच : एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन



मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत विविध विषयांवर झाले विचारमंथन






मुंबई : 'मराठी पत्रकार परिषद ही देशातील एकमेव अशी संघटना आहे, ज्यामध्ये दैनिक, साप्ताहिक, डिजिटल न्यूज पोर्टल तसेच युट्युब न्यूज चॅनलच्या पत्रकारांचा ही समावेश आहे. परिषदेने पत्रकारांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. कारण आपला लढा पत्रकारांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी सुरू आहे. पूर्वीपासून परिषद ही पत्रकारांच्या प्रश्नावर, हक्कावर, पत्रकारांच्या संरक्षणच्या मुद्द्यावर लढत आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून साप्ताहिकांच्या पत्रकारांना जाणून-बुजून बदनाम करण्याचे षडयंत्र काहीजण करत आहेत. साप्ताहिकांच्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळू नये, यासाठी काहीजण प्रयत्न करताना दिसतात. मात्र साप्ताहिकांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला सुद्धा अधिस्वीकृती मिळावी, यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढाकार घेत असून साप्ताहिकांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू राहणारच,' असे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले. 'साप्ताहिकांच्या पत्रकारांचे प्रश्न वेगळे असून त्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच राज्यभरातील साप्ताहिकांच्या पत्रकारांचा मेळावा घेतला जाईल,' असेही ते म्हणाले.

मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची  ऑनलाईन बैठक झाली. राज्यातील ३५ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांपैकी ३० जिल्ह्यातील प्रतिनिधी बैठकीस हजर होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. येत्या ३ डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त राज्यभर आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये राज्यातील दहा ते पंधरा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी होईल, यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.

बैठकीला विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेच्या डिझिटल शाखेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्याचे प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहाय्यक प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, भाऊसाहेब सकट (जि.कोल्हापूर),  दिपक शिंदे (जि.सातारा), प्रकाश  आरोटे  (अहमदनगर उत्तर), गजानन वाघ (वाशीम), विजय घरत (जि.पालघर), कमलेश ठाकूर (जि.रायगड), जमिर खलपे (जि. रत्नागीरी), गोपीभाऊ लांडगे (धुळे), संजय हांगे (बीड), सुनील वाघमारे (छत्रपती संभाजीनगर), सुभाष राऊत  (नागपूर), यशवंत थोटे   (गोंदीया), राम साळुंके (लातूर), बबलू दोडके (अमरावती), दिगंबर गायकवाड (नांदेड) आदी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख होते.

     याप्रसंगी एस. एम. देशमुख म्हणाले,'सर्व पत्रकारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सातत्याने आपला मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रव्यवहार सुरू असतो. गेल्या काही दिवसात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे. यावर आपण सातत्याने आंदोलने तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत असतो.आपली सुरू असलेली वेगवान चळवळ रोखण्यासाठी जाणीवपूर्वक काहीजण प्रयत्न करतात. मात्र आपल्याला ग्रामीण भागातील पत्रकारांपर्येंत पोहोचण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म आहे. सोशल मीडियावर सर्व जिल्हाप्रसिद्धीप्रमुखांनी ऍक्टिव्ह राहण्याची आवश्यकता असून एक दबाव गट निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,' असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले, 'आगामीकाळ निवडणुकीचा असून या काळात पत्रकार व राजकीय मंडळी यांच्यातील संघर्ष वाढत जाईल. अशावेळी आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे. सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना वाईट अनुभव येताना दिसतात. पत्रकारांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी ऍक्टिव्ह राहण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या जिल्ह्यात अद्याप पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती तयार झाली नाही, त्या जिल्ह्यातून तत्काळ या समितीच्या सदस्य पदासाठी जिल्ह्यातील पत्रकारांचे नाव देणे गरजेचे आहे.'

तर, यावेळी विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की, 'मराठी पत्रकार परिषदेचे आतापर्यंतची वाटचाल ही खूपच महत्त्वपूर्ण आहे. राज्यभरातील प्रसिध्दी प्रमुख हे परिषदेचे कान व डोळे आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची राज्यपातळीवर नोंद घेतली जात असते. जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून तुम्ही परिषदेचे कामकाज, हे गाव पातळीवर पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करता ते कौतुकास्पद आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याला मदत करण्यासाठी परिषदेचे राज्यातील प्रत्येक पदाधिकारी कटिबद्ध असून तुम्हाला जेव्हा मदतीची गरज लागेल, तेव्हा आवर्जून हाक द्या.'

     बैठकीत प्रास्ताविक करताना अध्यक्ष शरद पाबळे यांनी मागील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्या बैठकीचा आढावा सांगितला. तसेच लवकरच राज्यातील सर्व साप्ताहिकांच्या पत्रकारांचा एक मेळावा घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी काळात जिल्हाप्रसिद्धीप्रमुखांच्या कामाला गती मिळावी यासाठी प्रत्येक महिन्याला मीटिंग आयोजित करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या. परिषदेचे  सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी पत्रकारांना रेल्वे प्रवासात सवलत मिळावी, यासाठी मराठी पत्रकार परिषदेकडून सुरू असणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. या विषयावर नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार एक टीम कार्यरत करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.

Saturday, October 7, 2023

मंत्री शंभूराजे देसाई यांच्या यापुढील सर्व पत्रकार परिषदांवर पत्रकारांचा बहिष्कार

 मंत्री शंभूराजे देसाई यांच्या यापुढील सर्व त्रकार परिषदांवर पत्रकारांचा बहिष्कार





सातारा :
       राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या  पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सातारयातील पत्रकार संघटनांनी एकत्रित घेतला आहे.

       शंभूराजे देसाई यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणारया पत्रकारांशीच हुज्जत घातली..  प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे असा प्रतिप्रश्न करण्याचा तसेच आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही असे उत्तर देण्याचा प्रकार त्यांच्याकडून सातत्याने होत होता. त्यामुळे जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधिल नसतील तर पत्रकार परिषदेला जाण्यासही पत्रकार बांधील नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेवर यापुढे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठी पत्रकार परिषदेसह सर्व संघटनांनाचाही पाठिंबा आहे. 

     मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर, जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघ अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, राज्य महिला सरचिटणीस विद्या म्हासूर्णेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक राहुल तपासे, समन्वयक शंकर मोहिते, डिजिटल मीडिया राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, तुषार भद्रे, मराठी पत्रकार परिषद सलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सनी शिंदे, ११ तालुक्यांचे पत्रकार संघ यांनी हा निर्णय जाहीर केला.

       मंत्री शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पत्रकार परिषदांचा सपाटाच लावला आहे. या पत्रकार परिषदांमध्ये आपल्याला जे आवश्यक आहे तेवढीच माहिती देणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून हे योग्य नसल्याचेही त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. कोणत्याही पत्रकार परिषदेला वेळेवर न पोहचणे, पत्रकारांना वाट पहात थांबविणे, पत्रकार परिषदेच्या वेळांमध्ये सतत बदल करणे असे त्यांचे प्रकार सुरुच आहेत.

       पत्रकारांच्या माहितीबाबत सतत बोलल्यामुळे सर्व पत्रकारांचा कायम अपमान होत आहे. यामुळे आता त्यांच्या कोणत्याही पत्रकार परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी हा निर्णय घेतला असून त्याला मराठी पत्रकार परिषदेसह सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांनीही पाठिंबा दिला आहे. परिषदेचे एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी सातार्यातील पत्रकारांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Thursday, October 5, 2023

दत्तात्रय रोकडे यांना मुख्याध्यपक संघाचा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान

 दत्तात्रय रोकडे यांना मुख्याध्यपक संघाचा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान



सासवड|ता:05-

पुणे जिल्हा माध्य व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दि.४ ऑक्टोबर रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे याठिकाणी अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.सदर पुरस्कार सोहळ्यात पुरंदर तालुक्यातील श्री.भैरवनाथ विद्यालय वनपुरी या शाळेतील दत्तात्रय रोकडे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सपत्नीक यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.याबद्दल पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष सतिशभाऊ उरसळ,कार्याध्यक्ष अजितदादा निगडे,सचिव उत्तम निगडे,उपाध्यक्ष बापूसाहेब कुंजीर व संचालक मच्छिन्द्र कुंभारकर तसेच प्राचार्य राहुल येळे,सोमनाथ इंदलकर,मुख्याध्यापिका लता बोकड,नागनाथ ओव्हाळ तसेच संस्थेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक व प्रसिद्ध लेखक शरद तांदळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर तसेच माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील,सचिव शांताराम पोखरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पुणे जिल्हा माध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी शासनाच्या दत्तक व समूह शाळा आदेशाचा निषेध करून भविष्यात याविरोधात आंदोलन करण्याबाबत मत व्यक्त केले तसेच जुनी पेंशन योजना लागू करावी याशिवाय शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करायचे सोडून खाजगीकरणाचा जो काही घाट घालण्यात येतो आहे यामुळे सर्वसामान्यांच्या मुलांचे भविष्य संकटात टाकण्याचे जे प्रयत्न चालू आहेत याविरोधात आता रस्त्यावर उतरून लढा उभारण्यासाठी आपल्या सर्वांना तयार राहावे लागेल असे मत आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.

पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आपल्या मनोगतात संगितले की शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग प्रकल्प राबवितात. खरं शिक्षण हे शाळेत मिळत असते. चांगला विद्यार्थी तयार करण्याचे काम शिक्षक करतात. शासनाकडून अशैक्षणिक कामे कमी केले पाहिजे. शाळेचा मुख्याध्यापक हा कणा आहे. नेतृत्व, कौशल्य हे मुख्याध्यापकांच्यात असते त्यामुळे सर्वांना न्याय दिला जातो. परीक्षेसाठी भरारी पथक नेमली जातात. शाळांचे सरकारी अधिकारी कर्मचारी यांची भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे त्याला विरोध करावा लागेल. समूह शाळा योजना विरोध करावा लागेल. दत्तक शाळा योजनेचे स्वरूप बदलावे लागेल. याबाबत गांभीर्याने घेतले पाहिजे. आंदोलने उभे करावे लागेल. शालार्थ आय डी देण्यासाठीचे निकष बदलावे लागेल. शेवटच्या वर्गाची पटसंख्या यावर आणि शिक्षक संख्यावर परिणाम होतो तो होता कामा नये. अनुदानासाठी आता कोणतीही तपासणी न करता अनुदान दिले पाहिजे.

अध्यक्षीय मनोगतात उद्योजक आणि प्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांनी या भव्य दिव्य अशा सत्कार ओहळ्याच्या उत्कृष्ट नियोजन आणि आयोजन बद्दल पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कौतुक करून अभिनंदन केले.

 पुरस्कारथींच्या वतीने प्रतिनिधी म्हणून पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव दत्तात्रय रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले याशिवाय शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे मॅडम,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे के पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड,कार्याध्यक्ष मधुकर नाईक,पुणे शहर अध्यक्ष सुजित जगताप,सचिव शिवाजी कामथे,हनुमंत कुबडे,अरुण थोरात,शिवाजी किलकिले,कुंडलिक मेमाणे,हरिश्चंद्र गायकवाड, महेंद्र गणपुले,सुधाकर जगदाळे वसंतराव ताकवले,आदिनाथ थोरात,मारुती कदम,तबाजी वाघमारे,सुरेश कांचन,विठ्ठल चिकणे, रामराव पाडुळे,शिवाजी खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कामथे यांनी केले तर आभार प्रसाद गायकवाड यांनी मानले.

Wednesday, October 4, 2023

नीरा येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रक झाला पलटी सुदैवाने जिवीतहाणी नाही

 नीरा येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रक झाला पलटी

सुदैवाने जिवीतहाणी नाही 



 नीरा दि.४


     पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर बुधवारी पहाटे लोखंडी पाईप  घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामध्ये ट्रकच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.साईटपट्टी खचली असल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक लोकांनी म्हटले आहे.


      या संदर्भात ट्रकचालक शहाजन शेख (वय 38 रा.तुळजापूर)   यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे ते पुण्याहून साताराकडे निघाले होते. त्यांच्या ट्रक मध्ये लोखंडी पाईप भरलेले होते. पिंपरे आणि निरा यांच्या दरम्यान पुणे पंढरपूर महामार्गावर असताना समोरच्या बाजूने एसटी बस आल्याने त्यांनी त्यांचा ट्रक साईड पट्टीवर उतरवला. मात्र साईटपट्टीवर चिखल झाला असल्याने व ती मजबूत  नसल्याने ट्रकची डाव्या बाजूचे दोन्ही चाके या चिखलामध्ये खचली आणि ट्रक हळूहळू करत गटारामध्ये पलटी झाला.  ट्रक चालक  वेळीच ट्रकमधून खाली  उतरल्याने त्याला काही झाले नाही. मात्र यामध्ये ट्रकच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे पंढरपूर पालखी महामार्ग हा पिसूर्टी फाटा ते निरा या दरम्यान अत्यंतअरुंद आहे. त्यामुळे दोन वाहने आल्यास एक वाहन रस्त्यावरून खाली घ्यावे लागते. रस्त्याच्याकडेला असलेली साईडपट्टी ही खराब आहे. त्यामुळे जड वाहने या साईट पट्टीवर लगेच खचतात आणि पलटी होतात. मात्र बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत आहेत आणि वाहन चालकांना व मालकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.



 चौकट 

तातडीने रस्ता दुरुस्त न केल्यास येत्या पाच दिवसात रस्ता बंद करणार : कायदेतज्ञ पृथ्वीराज चव्हाण


   पिसूर्टी ते निरा यादरम्यानचा अरुंद रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यामुळे अनेकांना आपला जीव गमावू लागला आहे. चार दिवसांपूर्वीच पिंपरे येथील एका ४५ वर्षे व्यक्तीला आपला जीव गमावा लागला होता आणि आज पहाटे पुन्हा एकदा या ठिकाणी अपघात झाल्याने निरा आणि परिसरातील लोकांनी केंद्रीय बांधकाम विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. निरा येथील कायदेतज्ञ  पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील मोठा संताप व्यक्त केला आहे  पाच दिवसात या रस्त्याचं काम सुरू केलं नाही तर हा रस्ता जेसीबीने खोदून बंद केला जाईल असा इशारा त्यांनी केंद्रीय बांधकाम विभागाला दिला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने प्राधान्य क्रमाने हा रस्ता दुरुस्त करावा. या रस्त्याचे रुंदी वाढवावी अन्यथा होणाऱ्या आंदोलनाला आणि नुकसानाला केंद्रीय बांधकाम विभाग जबाबदार असेल असं म्हणत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर पुण्याचे पालकमंत्री ?

 राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर 


पुण्याचे पालकमंत्री ? 





मुंबई :

        राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. 


सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :- 


पुणे- अजित पवार 


अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील 


सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील 


अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- डॉ.विजयकुमार गावित 


बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील 


कोल्हापूर- हसन मुश्रीफ 


गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे 


परभणी- संजय बनसोडे 


नंदुरबार- अनिल पाटील 


वर्धा - सुधीर मुनगंटीवार 


   उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांंना पुन्हा पुणे जिल्ह्याचे पालकमु केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादा गटात पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात या निर्णयाचे स्वागत करत कार्यकर्त्यांनी फटाके फोड

Tuesday, October 3, 2023

सत्ताविरोधी पत्रकारांना जाणिवपूर्वक लक्ष्य देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय याची चाहुल मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून निषेध

 सत्ताविरोधी पत्रकारांना जाणिवपूर्वक लक्ष्य 


देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय याची चाहुल 


मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून निषेध 





मुंबई :

       देश हुकूमशाहीकडे वेगानं वाटचाल करतोय याची चाहूल केव्हाची लागली आहे. आजची ताजी बातमी त्याचीच पुढची पायरी आहे. सत्ताविरोधी पत्रकारांना देशात जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जाऊ लागलंय. आज सकाळी सकाळी दिल्लीहून जी बातमी आली आहे, ती माध्यमांचा भविष्यकाळ कसा असू शकेल याची जाणीव करून देणारी आहे. 


     दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी सकाळी दिल्लीतील पत्रकार आणि लेखकांच्या घरावर छापे घातले आहेत. हे सर्व पत्रकार न्यूज क्लिकशी संबंधित आहेत. पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल लॅपटॉप जप्त करण्यात आलेत. याशिवाय पत्रकार संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांच्या घरी पोलिसांनी छापे घातले आहेत. 


     यातील काही जणांना पोलिस ठाण्यात नेण्यात येत आहे. माध्यमांचा आवाज बंद करून देशातील पत्रकारांमध्ये दहशतीचे वातावरण तयार करण्यासाठी केल्या गेलेल्या या कारवाईचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, आणि डिजिटल मिडिया परिषद तीव्र शब्दात निषेध करीत आहे. 


     हा लढा केवळ माध्यमांचा नाही, लोकशाही आणि माध्यम स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जनतेनं पुढे आले पाहिजे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी

 केले आहे. 


गावकारभारी व्हाचय ! लागा कामाला. पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले.

 गावकारभारी व्हाचय ! लागा कामाला.

पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले.



पुरंदर :
      राज्यभरात गेली वर्षभरापासून रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अखेर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत. एक महिन्याचा निवडणुक कार्यक्रम असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान तर ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

      राज्यभरात ग्रामपंचायतीच्या नव्याने स्थापित झालेल्या तसेच २०२२ मध्ये चुकीच्या प्रभाग रचना योजना झाल्यामुळे निवडणुका न झालेल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकांसह या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर ९ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोट निवडणूका जाहीर झाल्या आहेत.


     पुरंदर तालुक्यातील गुळुंचे, कर्नलवाडी, वाल्हा, बागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वीर, माळशिरस, राजुरी व एखतपुर-मुंजवडी या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

पुरंदर तालुक्यातील या गावात पोट निवडणूका होणार ..

ग्रा. नाव            प्रभाग क्र.             प्रवर्ग

नायगाव.               १.              सर्वसाधारण
पांढे.                     १.             सर्वसाधारण
पानवडी.               १.             सर्वसाधारण स्त्री
सुपे खु.                 १.            अनुसूचित जमाती    
राख.                    २.             सर्वसाधारण
घेरापुरंदर.             १.             अ. जमाती स्त्री     
घेरापुरंदर.             २.             अ. जमाती स्त्री
घरापुरंदर.             १.             ना.मा.प्र. स्त्री
पांगारे.                  १.             ना.मा.प्र. स्त्री

      निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे की, सदर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मंगळवार (दि. ३ ऑक्टोबर) आचारसंहिता लागू झाली आहे. १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधित नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होईल. २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

   २५ ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख ५ नोव्हेंबर असणार आहे. सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे उप सचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतीचे बिगूल वाजले. राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

 पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतीचे बिगूल वाजले.


राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका






मुंबई  :  राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच २ हजार ९५० सदस्यापदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकांमुळे आता पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतींना आता कारभारी मिळणारं आहेत.

आचारसंहिता लागू -

निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे की, सदर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून मंगळवार (दि. ३ ऑक्टोबर) आचारसंहिता लागू झाली आहे. १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधित नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होईल. २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

   २५ ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख ५ नोव्हेंबर असणार आहे. सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. गडचिरोली आणि गोंदिया या भागात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. तर ०७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे उप सचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...