तलाठ्याच्या ४६४४ जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज
: तलाठी परीक्षेतून सरकारला 127 कोटींचा महसूल
मुंबई दि.२५
राज्यात चार वर्षापासून रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून तलाठी पदासाठी४६४४ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जागांसाठी राज्यभरात तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.या परीक्षा शुल्कापोटी सरकारच्या तिजोरीत तब्बल १२७ कोटी रुपयांचा महसुल जमा झाल आहे. विशेष म्हणजे, पी.एचडी., इंजिनिअर, एमबीए झालेल्या हजारो उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांनीही अर्ज केले आहेत.
राज्यात 4 वर्षांनंतर तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त मिळाला आहे. सरकारने ४६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून 26 जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात २३ जुलैपर्यंत सुमारे १३ लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अजून दोन दिवस म्हणजेच २५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.
यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केल्यास एका जागेसाठी २७५ उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झाली, याचे कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच शासनाला ही परीक्षा २० पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार आहे.
तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. २३ जुलैपर्यंत शासनाकडे १२ लाख ७७ हजार १०० अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल १२७ कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले आहेत. एवढंच नाही तर हा आकडा येत्या दोन दिवसांत अजून वाढणार आहेत.