Type Here to Get Search Results !

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द

 अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द; सदावर्ते यांना नेमकं काय भोवलं?



 मुंबई. दि. २८

            प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने मोठा झटका देण्यात आलेला आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून आता पुढील दोन वर्ष त्यांना कोणतीही केस लढता येणार नाही .


      मुंबईतील वकील सुशील मंचरकर यांनी बार कौन्सिल यांच्याकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवर तीन वकिलांच्या समितीने तपासणी करून गुणरत्न सदावर्ते यांना दोन वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही. अशा स्वरूपाची कारवाई केलेली आहे. एकूणच गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. बार कौन्सिलच्या नियम सात नुसार गुणरत्न सदावर्ते यांनी उल्लंघन केलं होतं आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे.


काही महिन्यांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपातील कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढवली होती.


एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांची बाजू मांडत असल्याचे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर अनेकदा सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला होता. एसटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विलीन करून घ्यावं यासोबतच त्यांना शासनाच्या सर्व सेवा मिळाव्यात यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयीन लढा दिला होता.


वकील गुणरत्न सदावर्ते हे न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत सुनावणी झाल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भेटीला येत होते. त्याच दरम्यान ते आपला न्यायालयीन गणवेश अनेकदा परिधान करून येत होते.



वकिलीचा गणवेश परिधान करून बाहेर सार्वजनिक ठिकाणी जाणे. हे बार कौन्सिलच्या नियमाला धरून नाही. इतकेच काय गणवेश परिधान केलेला असतानाही गुणरत्न सदावर्ते हे त्या ठिकाणी नृत्य करताना निदर्शनास आले होते. आणि हीच बाब बार कौन्सिलच्या नियमात बसत नाहीत.


गुणरत्न सदावर्ते यांचे आझाद मैदानावरील उल्लंघन वकील सुशील मंचरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट बार कौन्सिल कडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील आजाद मैदानावरील संपात सहभागी होत असताना वकिलीचा गणवेश घालून तिथे केलेला डान्स वकील गुणरत्न सदावर्ते यांना चांगलाच भोवला असून दोन वर्ष त्यांना कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाहीये.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies