दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी
दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असतानाच, त्या दु:खातूनच कर्तव्याचा नवा अध्याय सुरू झाला. दिवंगत दादांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी राजभवनात साध्या पण भावनिक वातावरणात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वैयक्तिक आघात बाजूला ठेवत, जनसेवेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला.
बुधवारी (दि. २८) सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सावडण्याचा विधी झाला, त्यानंतर त्याच रात्री सुनेत्रा पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या. शनिवारी सकाळीच राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू झाली आणि सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले.
सायंकाळी पाच वाजता राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे तीनशेहून अधिक मान्यवर उपस्थित होते. कोणताही दिखावा न करता, अत्यंत साध्या आणि भावनिक वातावरणात हा शपथविधी अवघ्या १५ ते २० मिनिटांत पार पडला. अजितदादांच्या आठवणींनी भारलेले वातावरण आणि सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांत दिसणारा संयम अनेकांना अंतर्मुख करणारा ठरला.
शपथविधीनंतर लगेचच खातेवाटप जाहीर करण्यात आले. अजित पवारांकडे असलेले अर्थ खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले नसले, तरी त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास ही तीन महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार : संघर्ष, सेवा आणि संवेदनशील नेतृत्व
सुनेत्रा पवार यांचे माहेर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील संत गोरोबाकाका यांच्या पावन भूमीत असलेल्या तेर गावचे. त्यांचे वडील मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक होते, तर मामा स्व. पद्मसिंह पाटील हे राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे समाजकारण आणि सार्वजनिक जीवनाचे संस्कार त्यांना लहानपणापासूनच लाभले.
अर्थशास्त्रातील पदवीधर असलेल्या सुनेत्रा पवार या केवळ अभ्यासूच नाहीत, तर बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. चित्रकला, संगीत, फोटोग्राफी आणि शेती या क्षेत्रात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील नेहरू सेंटर येथे भरवण्यात आले होते.
लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथील शेतीत त्या प्रत्यक्ष उतरल्या. स्वतः शेतात राबून शेती विकसित केली. दहा हजार पक्ष्यांची पोल्ट्री वाढवून ती एक लाखांपर्यंत नेली, शारदा दूध डेअरीच्या कामात सक्रिय सहभाग घेऊन दूध संकलनात लक्षणीय वाढ घडवून आणली.
अजितदादा पवार यांच्या राजकीय जबाबदाऱ्या वाढल्यानंतर, कुटुंबासह सामाजिक जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. विद्या प्रतिष्ठानच्या विद्यनगरी उभारणीत त्या सुरुवातीपासून सहभागी राहिल्या. पुढे त्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य म्हणूनही कार्यरत राहिल्या.
सन २००२ पर्यंत अत्यंत मागास असलेल्या काटेवाडी गावाला त्यांनी विकासाच्या शिखरावर नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली काटेवाडी निर्मलग्राम, यशवंतग्राम, तंटामुक्त ग्राम, विमाग्राम, देशातील पहिले सायबरग्राम, कृषिग्राम आणि पर्यावरणग्राम म्हणून ओळखले जाऊ लागले. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाड्यांना ISO मानांकन मिळाले, तर महिला, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.
‘शाळा प्रवेश उत्सव दिन’, ‘गुड मॉर्निंग पथक’, झिरो बॅलन्स खाते, ई-सेवा केंद्र, पाणीपुरवठा योजना, आरोग्य शिबिरे, महिलांसाठी रोजगारनिर्मिती, लाखो झाडांची लागवड अशा असंख्य उपक्रमांमुळे काटेवाडी देश-विदेशात चर्चेत आले. जागतिक बँक आणि सार्क देशांच्या प्रतिनिधींनीही या कामांची दखल घेत भेटी दिल्या.
चाळीस वर्षांच्या सामाजिक कार्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार झाल्या. पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी संसदेत ग्रामविकास, शिक्षण, महिला सुरक्षितता आणि पर्यावरण या विषयांवर ठाम भूमिका मांडली. मेक्सिको येथे झालेल्या जागतिक महिला खासदार परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत महिलांच्या सन्मान आणि हक्कांसाठी आवाज उठवला.
आज, अजितदादांच्या आठवणींना सोबत घेऊन, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दु:खातून उभे राहत कर्तव्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या या नेतृत्वाकडे संपूर्ण महाराष्ट्र आशेने पाहत आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा