पुरंदरचा राजकीय रणसंग्राम तापला; अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार मैदानात

पुरंदरचा राजकीय रणसंग्राम तापला; अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार मैदानात 



पुरंदर :

      पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगत वाढली असून, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही जिल्हा परिषद गटांमध्ये आता थेट लढती निश्चित झाल्या असून, ५ फेब्रुवारी रोजी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


      पुणे जिल्हा परिषद व पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होत असून, मंगळवारी (दि.२७) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघांतून तब्बल २१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात शिल्लक राहिले आहेत.

पंचायत समिती निवडणुकीसाठीही मोठ्या प्रमाणावर अर्ज माघारी घेण्यात आल्या असून, दाखल केलेल्या अर्जांपैकी ५१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. परिणामी आता ३३ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती जाणार आहे. 


     १६ ते २१ जानेवारीदरम्यान अर्ज भरण्याची मुदत होती. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी झाल्यानंतर तब्बल पाच दिवसांचा कालावधी अर्ज माघारीसाठी उपलब्ध झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रणनीती आखत मोठ्या प्रमाणावर माघारी घडवून आणण्यात यश मिळवले. 


     दिवे–गराडे जिल्हा परिषद गटात माघारीनंतर आता तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपकडून दिव्या संदीप जगदाळे, शिवसेनेकडून ज्योती राजाराम झेंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली अमोल झेंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. 


       बेलसर–माळशिरस गटात पाच उमेदवारांनी माघार घेतली असून सहा उमेदवार मैदानात आहेत. भाजपचे अजय कैलास इंगळे, शिवसेनेचे रमेश रामचंद्र इंगळे, शिवसेना (उबाठा)चे अमोल दत्तात्रय कामठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव विजयराव कोलते, आपचे शहाजी रत्नाकर कोलते आणि काँग्रेसचे दत्तात्रय मारुती झुरंगे यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. 


      वीर–भिवडी गटात नऊ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्या असून सहा उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्कराज संजय जाधव, शिवसेनेचे समिर अरविंद जाधव, काँग्रेसचे नवनाथ चंद्रकांत माळवे, भाजपचे हरिभाऊ कुंडलिक लोळे तर अनिल लक्ष्मण धिवार आणि हेमंतकुमार भाऊसाहेब माहूरकर हे दोघे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 


    निरा–कोळविहीरे गटात सहा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर चार उमेदवार उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, भाजपच्या सीमा संदीप धायगुडे, काँग्रेसच्या सविता राजेंद्र बरकडे आणि शिवसेनेच्या भारती अतुल म्हस्के या निवडणुकीच्या मैदानात आहेत. 


      एकूणच पुरंदर तालुक्यातील चार जिल्हा परिषद जागांसाठी विविध राजकीय पक्षांचे १७ आणि दोन अपक्ष असे १९ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे. येत्या काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढणार असल्याने पुरंदरचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.