Type Here to Get Search Results !

तणाव वाढला! कर्नाटकाने 'सीमा' ओलांडली; महाराष्ट्रात संतापाची लाट आली

 


मुंबई/बेळगाव : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक प्रशासनाने ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली.

महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूकही थांबविण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी मंगळवारचा आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे.

टाेलनाक्यावर बंदोबस्त
कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक व महाराष्ट्राचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. टोलनाक्याजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विजय देवणे यांनी कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना रोखले.

एसटी प्रवासाला ब्रेक
पोलिसांच्या विनंतीनुसार एसटी वाहतूक थांबविण्यात आली आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

..तर महाराष्ट्राचा संयम सुटेल : शरद पवार
सीमाभागात जे घडते आहे त्यावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत, त्यांचे सहकारी असे हल्ले करीत असतील तर हा देशाच्या ऐक्याला मोठा धक्का आहे. केंद्राने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. कुणी कायदा हातात घेतला तर त्याची जबाबदारी पूर्णतः केंद्र व कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल, असा इशाराही पवारांनी दिला.

...तर केंद्राकडे जावे लागेल : फडणवीस
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी मी चर्चा केली. हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे व असे प्रकार घडू न देण्याचे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. त्यावर मी लक्ष ठेवून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देणार आहे. कायदा हातात न घेता शांतता राखावी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कर्नाटकच्या गाड्यांना स्वारगेटला फासले काळे
स्वारगेट बसस्थानक परिसरातील सना ट्रॅव्हल्सच्या जवळ कर्नाटकातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना काळे फासण्यात आले, तर खेड शिवापूर टोल नाक्यावर गाड्यांची हवा सोडण्यात आली.

..तर मला कर्नाटकात यावे लागेल : संभाजीराजे
सौंदत्तीमधील भाविकांना कर्नाटक सरकारने संरक्षण द्यावे, अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे यांनी दिला.

...तर तुमच्या ५० फोडू
तुम्ही पाच गाड्या फोडल्या तर आम्ही तुमच्या ५० गाड्या फोडू, असा थेट इशारा देत कोल्हापुरात शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) रस्त्यावर उतरले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies