शहरातील मृत जनावरांचे पुण्यातील विद्युत दाहिनीत दहन करणार, दर महिन्याला 40 जनावरे होतायेत मृत


 पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, घोडा, गाढव आदी मोठ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचे दहन करण्याची व्यवस्था शहरात नाही.

त्यामुळे शहरातील मृत जनावारांचे दहन करण्यासाठी पुणे महापालिकेच्या विद्युत दाहिनीत पाठविण्यात येणार आहेत. यासाठी दर महिन्याला चार लाखांचा खर्च पालिकेला करावा लागणार आहे. दरम्यान, शहरात दर महिन्याला साधारण 40 मोठी जनावरे मृत होतात.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मृत पावलेली मोठी जनावरे उचलणे आणि विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने निविदा प्रसिद्ध केली होती. शहरातील मृत जनावरे पुण्यातील नायडू पॉन्ड येथील पालिकेच्या विद्युत दाहिनीत दहन करण्यात येणार आहेत. यासाठी मे. दिल्लीवाला ऍन्ड सन्स, पुणे यांनी हे कामकाज करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मनुष्यबळ वाहन भाडे, वाहन इंधन खर्च असे एका महिन्याला 2 लाख 61 हजार 753 रूपये तर अतिरिक्त कामकाजास 553 रूपये प्रति फेरी दराने मे. दिल्लीवाला ऍन्ड सन्स यांना देण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेस तीन हजार रूपये प्रती जनावर दहन करण्यासाठी देण्यात येणार आहेत. यापूर्वी शहरातील मृत जनावरे दफन केली जात होती. त्यासाठी सव्वा तीन लाखांचा खर्च येत होता. आता मृत जनावरे दहन करण्यात येणार असल्याने सर्व खर्च मिळून दर महिन्याला सुमारे 3 लाख 90 हजार रूपये खर्च येण्याची शक्‍यता आहे.

याबाबत पशुवैद्यकीय विभागाचे (PCMC) उपायुक्त सचिन ढोले म्हणाले, 'शहरात दर महिन्याला साधारण 40 मोठी जनावरे मृत होतात. आत्तापर्यंत मृत जनावरे दफन केली जात होती. मांस खाण्यासाठी मोकाट श्‍वान मातीत पुरलेली मृत जनावरे जमिनीतून काढण्याचे प्रकार होत होते. त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्‍न निर्माण होत होता. दफनपासून दहनाकडे वाटचाल करण्याच्या उद्देशाने पुणे पालिकेच्या नायडु पॉन्ड येथील विद्युत दाहिनीत मृत जनावरे दहन करण्याचा तात्पुरता निर्णय घेतला आहे. मृत जनावरांचे दहन करण्यासाठी पिंपरी पालिकेची स्वतंत्र विद्युत दाहिनी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी चऱ्होली, नेहरूनगर येथील जागेची चाचपणी करण्यात येत आहे'.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..