स्थानिक गुन्हे शाखेने जबरदस्त कारवाई करत दरोड्यातील आरोपींना अवघ्या 24 तासात जेरबंद केले आहे. सचिन भोसले (वय 28 वर्षे, रा. खरातवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), नितीन काळे (वय 25 वर्षे, रा. खरातवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), कृष्णा काळे (वय 25 वर्षे, टाकळी तांदळी, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर) या आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये भा.द.वि कलम 397, 34 अन्वये 28 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री दोन
वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. बबन भामे (रा. मावडी) यांच्या घरी चोरी
करण्याचे उद्देशाने तीन अज्ञात इसमांनी घरात प्रवेश केला होता. चोरी करण्यासाठी
आलेल्या इसमाकडून कडी कोयंडाचा आवाज झाला. तो आवाज ऐकून फिर्यादी हे जागी झाले असता
अज्ञात चोरांपैकी दोन आरोपींनी फिर्यादी यांना ढकलून दिले. त्यातील एका आरोपीने
त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार केला होता. यामुळे
आरोपी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले. त्यातील तिसऱ्या आरोपीने घटना चालू असताना
घरातील लाकडी कपाट तोडून कपाटातील रोख रक्कम दोन हजार रुपये आणि कपाटात असलेले
महत्वाचे कागदपत्रे घेऊन पळून गेला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने या
गुन्ह्याचा तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या
मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते.
सर्व आरोपी हे अहमदनगर परिसरात पळून
गेले असल्याचे समजले.
त्यावरून श्रीगोंदा तालुक्यातील
खरातवाडी येथे सापळा रचून या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे
चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत त्यांची खोटी नावे सांगितली.
बातमीदार आणि फिर्यादी यांनी सांगितलेले वर्णन यांच्या मदतीने हा गुन्हा वरील
आरोपींनीच केले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
असल्याचे समजले.
सचिन भोसले याच्या विरोधात श्रीगोंदा
पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 399
अन्वये गुन्हा दाखल असून त्यात तो गेली
चार वर्षे फरार आहे. तसेच त्याच्यावर चोरी, घरफोडी यासारखे आणि गुन्हे दाखल आहेत.
कृष्णा काळे विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारामारी आणि चोरीचे गुन्हे दाखल
आहेत. या आरोपींना पुढील तपासासाठी जेजुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले
आहे.
अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, आनंद भोईटी, अप्पर पोलीस अधीक्षक, धनंजय पाटील, पोलीस उपअधीक्षक भोर
विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार तुषार
पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, पोलीस हवालदार विजय कांचन, पोलीस हवालदार अभिजीत
एकशिंगे, पोलीस नाईक अमोल शेळके, पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव, पोलीस कॉन्स्टेबल
दगडू विरकर यांनी ही कारवाई केली आहे.