Type Here to Get Search Results !

मुंबईच्या रस्त्यावर कोरियन तरुणीसोबत लाज वाटणारे कृत्य, तरुणाने हात पकडला आणि... VIDEO

 


मुंबई, 01 डिसेंबर : जगभरातील व्यक्तींना भारतीय संस्कृतीबद्दल कायम आकर्षण वाटत आलेलं आहे. त्यामुळे जगभरातून लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात. भारतीय लोक त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे आदरातिथ्यही करतात.

मात्र, काही समाजकंटक आणि वाईट प्रवृत्तीचे लोक पर्यटकांशी गैरवर्तन करतात. मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील रस्त्यावर एका दक्षिण कोरियातील युट्यूबर मुलीची छेड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून नेटिझन्सनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई पोलिसांनीही या मागणीला प्रतिसाद दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य नावाच्या युजरनं ट्विटरवर एका दक्षिण कोरियन युट्यूबर मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ती युट्यूब लाइव्ह करत असताना एका तरुणानं तिचा हात पकडून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. साधारण एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये ती तरुणी विरोध करत असतानाही एक व्यक्ती तिचा हात पकडून तिला गाडीवरून लिफ्ट देतो असं म्हणत असल्याचं दिसत आहे.

तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे संबंधित तरुणी लाइव्ह स्ट्रिमिंग करत आहे. तिने अतिशय शांत राहून आणि प्रसंगावधान राखत त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. लाइव्ह स्ट्रीम संपवण्याचा प्रयत्न करून ती तिथून निघते.

पण, तिची छेड काढणारा तरुण काही वेळातच बाईकवर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत तिच्या मागे येतो आणि पुन्हा लिफ्ट देऊ करतो. मोडक्या-तोडक्या इंग्रजीत तो तिला गाडीवर बसण्यास सांगतो. आपली गाडी जवळच पार्क केलेली आहे, असं उत्तर देऊन ती मुलगी तिथून निघण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे" @MumbaiPolice काल रात्री खार परिसरामध्ये कोरियातील एका स्ट्रीमर मुलीची या मुलांनी छेड काढली.

लाइव्ह स्ट्रीमिंगमधील हजारपेक्षा जास्त लोकांसमोर ही घटना घडली आहे. हे अतिशय घृणास्पद असून त्यांच्यावर काही कारवाई होणं गरजेचं आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे," अशा कॅप्शनसह आदित्य नावाच्या युजरनं ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ नंतर Mhyochi नावाच्या अकाउंटनं रिट्विट केला आहे.

अकाउंटच्या बायोमधील माहितीनुसार, हे अकाउंट एका 24 वर्षीय कंटेंट क्रिएटर आणि गेमर मुलीचं आहे. "काल रात्री लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान एका तरुणानं मला त्रास दिला. ती व्यक्ती मित्रासोबत होती. परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले.

काही लोकांच्या मते, मी खूप मैत्रीपूर्ण संभाषणात गुंतल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे मला स्ट्रीमिंग करण्याबाबत पुन्हा विचार करायला भाग पाडलं आहे," असं Mhyochiनं म्हटलं आहे. भारतीय युजरनं मुंबई पोलिसांना टॅग करून व्हिडीओ पोस्ट केला होता. मुंबई पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद दिला. मुंबई पोलिसांनी संबंधित तरुणीला आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करण्यास सांगितले आहेत, जेणेकरुन या प्रकरणाची चौकशी करता येईल. पीटीआयनं स्थानिक पोलीस अधिकाऱ्याचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies