Type Here to Get Search Results !

पोरगा मंत्री झाला अन् 94 वर्षांच्या तानुबाईंनी 100 किलो पेढे वाटून विठ्ठलाचा नवस फेडला

 


Pandharpur : खरंतर पंढरीचा पांडुरंग हा नवसाला पावणारा देव म्हणून कधीच ओळखला जात नसला तरी आपल्या वारकरी भक्तांच्या या इच्छा तो नेहमीच पूर्ण करत असतो आणि असाच अनुभव 94 वर्षांच्या तानुबाई या मातेला आला.

यामुळंच या मातेनं विठ्ठलाच्या मंदिरात येऊन 100 किलो पेढे वाटले अन् नवस फेडला. 'आपला पोरगा मंत्री व्हावा त्याच्या हातून गोरगरिबांची सेवा घडू दे बा, विठ्ठला, तुझ्या नावाने 100 किलो पेढे वाटेन' असं घातलेलं साकडं पूर्ण करण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या आई तानुबाई दगडू खाडे आज पंढरपूरमध्ये आल्या होत्या.

तानुबाई यांचे वय 94 वर्षे आहे. तानुबाई या श्री विठ्ठलाच्या निस्सीम भक्त. दरवर्षीच्या वारीला त्यांची न चुकता हजेरी असते. तानुबाई यांच्या आग्रहखातर त्यांच्या दुसरा मुलगा उद्योगपती अशोक खाडे यांनी श्री विठ्ठल मंदिराच्या श्री रुक्मिणी मंदिराकडील दरवाजा चांदीचा करुन दिला आहे.

तानुबाई गेल्या काही महिन्यापासून गंभीर आजारी होत्या आजारातून त्या काहीशा बऱ्या झाल्यानंतर त्यांनी आज एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत मंत्री सुरेश खाडे, बंधू अशोक खाडे यांचे सह पूर्ण परिवार उपस्थित होता. विठुरायचे दर्शन घेतल्यावर लगेचच उपस्थित भक्तांना 100 किलो पेढे वाटत या माऊलीने आपला नवस देखील पूर्ण केला.

सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्यातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सांगली जिल्ह्यात भाजप कमळ प्रथम सुरेश खाडे यांच्या रूपाने फुलले. आधी जत आणि 3 वेळा मिरज अशा एकूण चार वेळा सुरेश खाडे हे आमदार झालेत. भाजप आमदारामधील मागासवर्गीय (चर्मकार समाज) मधील चेहरा असल्याने मंत्रिपदाची संधी मिळाली. मूळचे तासगाव तालुक्यातील पेड गावचे असले, तरी जत आणि मिरज विधानसभा मतदारसंघात देखील खाडे यांचा प्रभाव आहे. मुंबईत जाऊन उद्योग क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या दास कंपनीचा विस्तार केलेल्या अशोक खाडे यांचे सुरेश खाडे हे बंधू आहेत. 2019 साली शेवटच्या टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तारात खाडे यांना केवळ 3 महिन्यांसाठी कॅबिनेट मंत्री पद मिळालं होतं.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies