डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासाहर्ता मिळविली तर या माध्यमालाही लोकमान्यता मिळू शकेल- एस.एम.देशमुख
अहमदनगर - दि.१२
डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासार्हता मिळविली तर या माध्यमाला लोकमान्यता देखील मिळू शकेल असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या अहमदनगर जिल्हा शाखेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला.. त्यावेळी देशमुख बोलत होते.. यावेळी नगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी अफताब मन्सूरभाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली.. कार्यक्रमास परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे उपस्थित होते..
एस.एम देशमुख यांनी डिजिटल मिडिया परिषदेच्या स्थापनेपासून मागची भूमिका विस्तारानं मांडली.. ते म्हणाले, डिजिटल मिडियाने माध्यमातील मोठा अवकाश व्यापला आहे.. राज्यात पाच हजारपेक्षा जास्त युट्यूब चॅनल्स आणि पोर्टल कार्यरत आहेत.. या माध्यमात वीस हजारांवर पत्रकार काम करीत असून त्यांचे म्हणून काही प्रश्न आहेत.. डिजिटल मिडियाला सरकारी जाहिराती मिळत नाहीत, अधिस्वीकृती पत्रिका दिल्या जात नाहीत.. त्यांना पत्रकार म्हणूनच मान्यता दिली जात नाही.. या आणि अन्य प्रश्नांवर आवाज उठवून ते सोडविण्याचा प्रयत्न डिजिटल मिडिया परिषद करणार आहे.. मात्र हे सारं करतानाच डिजिटल मिडियाला लोकमान्यता मिळवायची असेल तर या माध्यमाला विश्वासार्हता कमवावी लागेल.. डिजिटल मिडियात आलेली बातमी केवळ सत्य आणि सत्यच असते याची खात्री जोपर्यंत लोकांना होत नाही तोपर्यंत ते या माध्यमावर विश्वास ठेवणार नाहीत असे देशमुख यांनी स्पष्ट केले..नगरच्या देदीप्यमान पत्रकारितेच्या इतिहासाचा एस.एम.देशमुख यांनी गौरवपूर्ण भाषेत उल्लेख करताना डिजिटल मिडियातील पत्रकार देखील ही परंपरा पुढे चालू ठेवतील असा विश्वास व्यक्त केला.नगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष म्हणून अफताब शेख यांची नियुक्ती करण्यात आली.. त्यांनी जिल्ह्यात फिरून सदस्य नोंदणी करून जिल्हा कार्यकारिणी तयार करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे.. यावेळी एस.एम.देशमुख आणि शरद पाबळे यांच्या हस्ते अफताब यांचा सत्कार करण्यात आला.. शरद पाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले..
कार्यक्रमांस परिषदेचे मन्सूरभाई, तसेच ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम आणि डिजिटल मिडिया चे पन्नासवर पत्रकार उपस्थित होते..राज्यातील अन्य जिल्ह्यात देखील लवकरच डिजिटल मिडिया शाखा सुरू करण्यात येत असल्याचे शरद पाबळे यांनी यावेळी सांगितले..