आरारा हा नाद लयीच बेक्कार ; रेल्वेच्या चालकाला आली दारू प्यायची हुक्की,
मग ट्रेन थांबवून गेला गुत्त्यावर
पाटना : संपूर्ण दारूबंदी असलेल्या बिहार मध्ये एका ट्रेन चालकाला दारू प्यायची हुक्की आली आणि ट्रेन उभी करून थेट दारूचा गुत्ताच गाठला
त्याने दारू पिण्यासाठी बराच वेळ ही ट्रेन एका जागेवर उभी केली मात्र नंतर दुसऱ्या चालकाने येऊन ती ट्रेन बाजूला नेली.
हसनपूर येथे साधारणपणे दोन मिनिटांचा थांबा असलेली ट्रेन सोमवारी संध्याकाळी तासभर उभी होती. प्रवाशांनी केलेल्या गोंधळानंतरच रेल्वे अधिकाऱ्यांना चालकांच्या या प्रकरणाची माहिती मिळाली. पॅसेंजर ट्रेन क्रमांक ०५२७८ सोमवारी संध्याकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी समस्तीपूर रेल्वे स्टेशनवरून निघाली आणि हसनपूरला ५.४५ वाजता पोहोचली. ट्रेनचे शेवटचे स्थानक सहरसा आहे, जिथे ती रात्री ८.३० वाजता पोहोचते. हसनपूर रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर मनोज कुमार चौधरी यांनी म्हटले की, "जेव्हा प्रवासी रेल्वे स्थानकावर गोंधळ घालत होते, तेव्हा आम्ही ड्रायव्हरच्या केबिनमध्ये गेलो. तेव्हा चालक करमवीर यादव उर्फ मुन्ना इंजिन रूममधून बेपत्ता होता.
यानंतर त्यांनी इतरत्र शोध घेतला असता "हसनपूर मार्केटमध्ये मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तिथे पोहचल्यावर त्यांनी त्याला अटक केली. करमवीर यादव हा हसनपूर येथील लोकल ट्रेनचा चालक असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून दारूची अर्धी बाटलीही जप्त केली आहे. सध्या त्याला अटक करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या घटनेनंतर समस्तीपूर झोनचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक अग्रवाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली. करमवीर यादव मद्यधुंद अवस्थेत सापडल्यानंतर तेथीलच एक लोको पायलट व्ही.सी. रजेवर जात होता योगायोग असा की तो याच ट्रेनमधून प्रवास करत होता. दरम्यान सुट्टीवर जात असलेल्या राजकुमारने सहरसाला जात असताना अखेर ही ट्रेन स्थानकावरून ६.४५ वाजता हलवली.