वाघीरे विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन

 वाघीरे विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन



सासवड प्रतिनिध दि .६

सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघीरे विद्यालयांमध्ये शनिवार दिनांक ५ मार्च २०२२ रोजी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता *'परीक्षेला सामोरे जाताना'* या विषयावरती विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.


महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुणे येथील भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी असणारे आणि करिअर मार्गदर्शक म्हणून कार्य करणारे, 'सजग नागरिक मंच' चे संस्थापक श्री.विवेक वेलणकर हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ यांनी केले. गेली दोन वर्षे कोरोना व्याधीमुळे शाळा व्यवस्थित होऊ शकल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना मोठे दडपण आलेले आहे. ते कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम अचूक निवडता यावा विशेष मार्गदर्शन आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.


श्री विवेक वेलणकर यांनी आपल्या प्रमुख भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे अनावश्यक दडपण मनावर न बाळगता घेता परीक्षेला सामोरे जावे असा उपदेश केला. 


फक्त गुण मिळवण्यापेक्षा विषय समजून घेऊन अभ्यास करणे;  दररोज,आठवड्याच्या शेवटी आणि महिन्याच्या शेवटी शिकवलेल्या भागांची उजळणी करणे; दैनंदिन अभ्यासाचे वेळापत्रक ठरवणे या गोष्टी यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 


इयत्ता दहावीनंतर  अविचाराने अथवा मित्र, आईवडील यांच्या इच्छेखातर अभ्यासक्रम निवडण्यापेक्षा आपल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार अभ्यासक्रम निवडून विद्यार्थ्यांनी त्यामध्ये प्रावीण्य मिळवावे असे ते म्हणाले. याचबरोबर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्यपणे माहीत असलेल्या करिअरच्या वाटा सोडून अन्य असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायांची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या भाषणांमध्ये माहिती दिली.



सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका सौ. अर्चना उबाळे यांनी केले तर पर्यवेक्षक श्री बाळासाहेब जायभाय यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. दत्ताराम रामदासी, पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. विभावरी दळवी यांचीही मंचावर उपस्थिती होती.


या व्याख्यानासाठी शाळेचे सर्व विद्यार्थी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..