नीरेतील धाडसी पोलिसांचा पत्रकार संघाकडून सत्कार

 नीरेतील धाडसी पोलिसांचा पत्रकार संघाकडून सत्कार

सिनेस्टाईल कारवाईत अपहरणग्रस्त तरुणाची सुखरूप सुटका


नीरा | प्रतिनिधी

भोर तालुक्यातील कापूरहोळ येथून अपहरण झालेल्या तरुणाची सिनेस्टाईल पाठलाग करून सुखरूप सुटका करणाऱ्या नीरा पोलिसांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ आणि नीरा प्रेस क्लब यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या धाडसी कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंगळवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास कापूरहोळ येथील व्यावसायिक लखन दळवी यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्ते नीरा दिशेने निघाल्याची माहिती मिळताच नीरा दूरक्षेत्रातील पोलिसांनी तात्काळ शहरात नाकाबंदी केली. तसेच अपहरणकर्ते ज्या मार्गाने येण्याची शक्यता होती त्या दिशेने पोलीस वाहनासह धाव घेतली.

पोलिसांची चाहूल लागताच अपहरणकर्त्यांनी मुख्य रस्ता सोडून कच्च्या मार्गाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग कायम ठेवला. घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी तरुणाला चालत्या गाडीतून रस्त्यावर ढकलून दिले. पोलिसांनी तत्काळ त्या मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले आणि पुढील पाठलाग सुरूच ठेवला.

दरम्यान, पुढे जाऊन अपहरणकर्त्यांची कार उसाच्या शेतात अडकल्याने त्यांनी पळ काढला. पोलिसांनी मांडकी गावाच्या हद्दीत पाचपैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले. अपहरणकर्त्यांकडे कोयता, चाकू आणि रिव्हॉल्व्हर अशी घातक शस्त्रे होती. तरीही पोलिसांनी प्रसंगावधान राखत धाडसाने कारवाई केली. सुटका केलेल्या तरुणाला पुढील कार्यवाहीसाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



या धाडसी


कारवाईत नीरा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कोकरे, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र करे आणि प्रसाद कोळेकर यांनी विशेष धाडस दाखवले.

पत्रकार संघाकडून गौरव

या कामगिरीबद्दल पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य सहसचिव राहुल शिंदे, पुणे जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भारत निगडे, पुरंदर तालुका डिजिटल मीडिया परिषदेचे सचिव स्वप्निल कांबळे तसेच मोहम्मदगौस आतार यांनी नीरा पोलीस चौकीत जाऊन तिन्ही पोलिसांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या धाडसी कारवाईचे कौतुक करत पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.



 कोट


“नीरा परिसरात यापूर्वी दोन अपहरण प्रकरणांत दुर्दैवाने मुलांचा मृत्यू झाला होता. मात्र यावेळी पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता तातडीने कारवाई करत मुलाची सुटका केली. अशी जोखीम पत्करणाऱ्या पोलिसांचा राज्य सरकारनेही सन्मान करावा.”


भारत निगडे (प्रसिद्धी प्रमुख, मराठी पत्रकार परिषद, मुंबई)



पोलिसांनी केवळ नाकाबंदीवर थांबून न राहता स्वतः पुढाकार घेत अपहरणकर्त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळेच मुलाची सुटका शक्य झाली. अशा कार्यतत्पर पोलिसांचा गौरव होणे आवश्यक आहे.”

या संपूर्ण कारवाईमुळे नीरा परिसरात पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून नागरिकांकडून धाडसी पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


राहुल शिंदे (राज्य सहसचिव, डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई