पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल आदित्य संतोष सूर्यवंशी यांचा ग्रामस्थांकडून भव्य सत्कार
पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल आदित्य संतोष सूर्यवंशी यांचा ग्रामस्थांकडून भव्य सत्कार
निरा परिसरातील तरुण आदित्य स्वाती संतोष सूर्यवंशी यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात आदित्य यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी निरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सर्जेराव पुजारी साहेब यांच्या शुभहस्ते आदित्य सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. दत्ताजीराव रामराव चव्हाण (आबा) यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामस्थांच्या वतीने प्रसिद्ध फेटेवाले माऊली गायकवाड यांच्या हस्ते आदित्य यांना फेटा बांधून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, दत्ताजीराव चव्हाण आबा तसेच ग्रामस्थांच्या वतीने आदित्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदित्य यांच्या आईचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश घुले सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात आदित्य सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचा संघर्षमय प्रवास मांडत तरुण पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजक पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मनात ठरवले तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आदित्य सूर्यवंशी. वडिलांच्या निधनानंतर आईने मोठ्या कष्टाने त्याचे संगोपन केले आणि त्या कष्टाचे चीज आज झाले आहे. आदित्यच्या यशामुळे सूर्यवंशी कुटुंबाची तसेच गावाची मान उंचावली आहे. भविष्यात तो देश, राज्य आणि समाजाची सेवा निश्चितच उत्तम प्रकारे करेल.”
सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे यांनी आपल्या मनोगतात संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत आदित्य हा तरुण पिढीसाठी आदर्श असल्याचे सांगितले. तरुणांनी त्याचा आदर्श घेऊन परिश्रम आणि प्रामाणिकपणाने यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अनिल चव्हाण, अजित सोनवणे, दयानंद चव्हाण, धर्मराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आदित्य यांना शुभेच्छा दिल्या.
स्वतःच्या भाषणात आदित्य सूर्यवंशी म्हणाले की, “आयुष्यात मी अनेक कष्ट आणि संघर्ष पाहिले. त्या सर्व कष्टांचे आज चीज झाले आहे आणि माझ्या आईच्या डोळ्यातील आनंद पाहून मला सर्वात जास्त समाधान वाटते. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. ध्येय निश्चित ठेवले तर यश नक्की मिळते. समाजाशी असलेली नाळ मी कधीही तुटू देणार नाही.”
पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांनी आपल्या भाषणात आदित्यच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत तरुण पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात; परंतु त्यावर मात करत पुढे जाणे महत्त्वाचे असते.” त्यांनी आदित्यला मौलिक सल्ला देत सांगितले की, “तू कितीही मोठा झाला तरी आपल्या गावाशी असलेली नाळ कधीही तुटू देऊ नको.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताजीराव रामराव चव्हाण (आबा) यांनी आपल्या भाषणात आदित्यच्या जिद्दीचे कौतुक केले. समाजात संस्कार आणि चांगली संगत किती महत्त्वाची आहे यावर त्यांनी प्रभावी उदाहरण देत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, समाजात अशा प्रकारचे प्रेरणादायी कार्यक्रम होत राहणे आवश्यक आहे, ज्यामुळे आदित्यसारखे अनेक तरुण घडतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश घुले सर यांनी केले, तर संग्राम पवार यांनी आभार प्रदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन पृथ्वीराज चव्हाण व मित्र परिवार यांनी केले.
या प्रसंगी अनिल चव्हाण, सचिन मोरे, मनोज शहा, अजित सोनवणे, विलास धोत्रे, राहुल शिंदे, अनिल धोत्रे, प्रवीण भोईटे, सागर सपकाळ, अभिजीत जगताप, दयानंद चव्हाण, स्वप्निल कांबळे, अक्षय चव्हाण, योगेश घुले, मनोज पोमण, अभिलाष संकपाळ, सतीश दळवी, सचिन चव्हाण, विजय सपकाळ, प्रतीक चौगुले, कुंदन जावळे, आकाश पाटोळे, सूरज घोलप, बाबुराव चव्हाण, अशोकराव चव्हाण, अजित निगडे, दादा फरांदे, दत्ता निंबाळकर, अमोल कदम, ओंकार घोलप, चैतन्य शेवाळे, दीपक जाधव, निलेश गोरे, प्रवीण डोईफोडे, शिवम चव्हाण, अमित कुलमाळी, बाळासाहेब निगडे, प्रमोद करंजे, अनिकेत सोनवणे, राहुल थोरात, बाळा लकडे, रियाज पठाण आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.
आदित्य सूर्यवंशी यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेला हा भव्य सत्कार समारंभ अत्यंत प्रेरणादायी ठरला.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा