डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार; बारामतीत 74 वर्षीय महिलेला 45.60 लाखांचा गंडा
डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार; बारामतीत 74 वर्षीय महिलेला 45.60 लाखांचा गंडा
पोलीस असल्याचे सांगत व्हिडिओ कॉल; अटक वॉरंटची भीती दाखवून एफडी तोडायला लावली
बारामती :
बारामती शहरात सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत एका भामट्याने 74 वर्षीय महिलेकडून तब्बल 45 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला उद्धव खर्डे (वय 74, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांना 14 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीकडून मोबाईलवर WhatsApp द्वारे व्हिडिओ कॉल करण्यात आला. संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव “संदीप पाटील” असे सांगत तो पोलीस अधिकारी असल्याचा बनाव केला आणि पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने महिलेला त्यांच्या विरोधात अटक वॉरंट असल्याचे सांगून “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवली. या भीतीमुळे महिला मानसिक दबावाखाली आल्याने आरोपीने त्यांना बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) तोडण्यास भाग पाडले.
आरोपीच्या सांगण्यावरून महिलांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर केले. त्यामध्ये 34 लाख 60 हजार रुपये आणि 11 लाख रुपये असे मिळून एकूण 45 लाख 60 हजार रुपयांची रक्कम आरोपीने फसवणुकीने घेतल्याचे समोर आले आहे.
नंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 83/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन बारामती शहर पोलीसांकडून करण्यात आले आहे. फोन किंवा व्हिडिओ कॉलवर स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा न्यायालयाचा अधिकारी असल्याचे सांगत “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवली जात असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तसेच कोणत्याही परिस्थितीत फोनवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत. अशा प्रकारचा संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी नागरिकांना केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा