दादांशिवाय पहिलीच सांगता… पुरंदर गहिवरला; आठवणींनी भर सभेत अश्रू अनावर
दादांशिवाय पहिलीच सांगता…
पुरंदर गहिवरला; आठवणींनी भर सभेत अश्रू अनावर
पुरंदर :
पुणे जिल्हा परिषद व पुरंदर तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. मात्र यावेळी प्रचाराची सांगता नेहमीसारखी नव्हती, ती होती मौनात, आठवणींत आणि अश्रूंमध्ये. पुरंदर आणि बारामती तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीचा शेवट ज्यांच्या दमदार, ज्वालाग्राही आणि लोकांच्या काळजात घर करणाऱ्या सभेने व्हायचा, ते दिवंगत अजित पवार आज प्रत्यक्षात नव्हते. पण त्यांच्या आठवणी मात्र प्रत्येक कार्यकर्त्याच्या, उमेदवाराच्या आणि मतदाराच्या डोळ्यांत पाण्यासारख्या दाटून आल्या होत्या.
दादांच्या सांगता सभेशिवाय प्रचाराची सांगता होणे, हे पुरंदरकरांसाठी अवघड क्षण होते. विमान अपघातात त्यांच्या आकस्मिक निधनामुळे यंदा ती सभा होऊ शकली नाही. मात्र, त्यांनी मागील निवडणुकांत गाजवलेल्या असंख्य सांगता सभांच्या आठवणी आजही जिवंत आहेत—आणि त्याच आठवणींनी गुरुवारी नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद व पुरंदर तालुका पंचायत समितीच्या निमित्ताने झालेल्या कोपरा सभेत उपस्थितांचे मन गहिवरले.
या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार—सगळेच हळवे झाले होते. काहींच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते, तर काहींना रडू अनावर झाले. कारण ही केवळ प्रचाराची सांगता नव्हती; ती होती दादांशिवाय झालेली पहिली सांगता.
राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. ५) प्रचार थांबला. पुरंदर तालुक्यातही हीच परिस्थिती होती. याआधी ठरल्याप्रमाणे दादांनी नीरा येथे सांगता सभा आणि रात्री कार्यकर्त्यांसोबत जेवणाची वेळ दिली होती. तो क्षण आज आठवणीतच उरला. दादांच्या अचानक जाण्याने हे संपूर्ण कुटुंब—कार्यकर्त्यांचे, चाहत्यांचे—आजही सावरलेले नाही.
खरे तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील प्रत्येक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगता सभेनेच वातावरण बदलायचे. विरोधकांचे पारडे कितीही जड असले, तरी दादांची सभा झाली की चित्र पालटायचे. त्यांच्या सभा नेहमी गर्दीने फुलून जायच्या, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारायची आणि उमेदवारांना विजयाची खात्री वाटायची.
दादांनी केलेल्या आवाहनाला मतदारांनी नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिला. “तुम्ही माझ्याकडे बघून मत द्या, मीच उमेदवार आहे,” असे म्हणत ते मतदारांशी थेट नातं जोडायचे. त्यांच्या भाषणात फटकेबाजी होती, धारदार टोले होते, हास्यविनोद होता—आणि गरज पडली की विरोधकांवर कडक शब्दांत प्रहारही. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना दिलेले इशारेही त्यांच्या सभेची ओळख होती. त्यामुळेच त्यांच्या सांगता सभांकडे इलेक्ट्रॉनिक मीडियाचेही विशेष लक्ष असायचे.
आज मात्र ती शैली, तो आवाज, ती उर्जा प्रत्यक्षात नाही—आणि हीच उणीव सर्वांनाच तीव्रतेने जाणवत आहे. प्रचाराची सांगता झाली असली, तरी पुरंदरच्या राजकारणात दादांची सांगता आजही झालेली नाही. ती सुरू आहे—लोकांच्या आठवणीत, डोळ्यांतल्या अश्रूंमध्ये आणि मनातल्या अपार आपुलकीत.
.jpg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा