विकास पदोपदी म्हणूनच राष्ट्रवादी! निरा–कोळविहीरे गटात आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती व रोजगाराचा ठोस वचननामा
विकास पदोपदी म्हणूनच राष्ट्रवादी!
निरा–कोळविहीरे गटात आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती व रोजगाराचा ठोस वचननामा
पुरंदर :
निरा–कोळविहीरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी विकासाला केंद्रस्थानी ठेवत सर्वसमावेशक व लोकाभिमुख असा वचननामा जाहीर केला आहे. आरोग्य, महिला सक्षमीकरण, शिक्षण, शेती, युवक रोजगार आणि पायाभूत सुविधांचा समतोल विकास साधण्याचा निर्धार या वचननाम्यात स्पष्टपणे मांडण्यात आला आहे.
आरोग्य व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (PHC) सक्षमीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रत्येक PHC मध्ये तज्ज्ञ डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ, अद्ययावत रक्तचाचणी सुविधा तसेच २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिलांसाठी गावोगावी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
महिला आर्थिक सक्षमीकरणाचा ठाम संकल्प
महिलांच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ठोस योजना मांडल्या आहेत. १० महिला क्रीडापटूंना विशेष शिष्यवृत्ती, १० नाविन्यपूर्ण महिला गृहउद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच १० वी व १२ वी नंतर विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शनासह शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुली व महिलांसाठी शैक्षणिक आर्थिक मदतही देण्यात येणार आहे.
शेती व पशुसंवर्धनाला चालना
शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान व मार्गदर्शन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, पशुवैद्यकीय दवाखाने आणि मोफत उपचार शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. दूध व्यवसाय व पशुसंवर्धन वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य देण्याचेही वचननाम्यात नमूद आहे.
शिक्षण व्यवस्थेचा दर्जा उंचावणार
शाळांच्या इमारतींचे बांधकाम व दुरुस्ती, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित शालेय सुविधा, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे दर्जेदार व्यवस्थापन तसेच डिजिटल शिक्षण व आधुनिक सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी
‘गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात ‘लघुउद्योग केंद्र’ आणि ‘कौशल्य विकास केंद्र’ उभारण्यात येणार आहेत. स्थानिक युवकांना आपल्या गावातच रोजगार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
दळणवळण व पायाभूत सुविधा मजबूत करणार
ग्रामीण रस्ते व पुलांचे दर्जेदार बांधकाम, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल, शाळा, आरोग्य केंद्रे व ग्रामपंचायत इमारतींची उभारणी करण्याचा स्पष्ट आराखडा वचननाम्यात मांडण्यात आला आहे.
निरा–कोळविहीरे जिल्हा परिषद गटासाठी दुगडे प्राजक्ता दिगंबर, कोळविहिरे पंचायत समिती गणासाठी निगडे स्मिता संतोष आणि निरा–वाल्हे पंचायत समिती गणासाठी कांबळे मोनिका स्वप्निल या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी विकासाभिमुख वचननाम्याच्या जोरावर मतदारांसमोर विश्वासाने आपली भूमिका मांडली आहे.
शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून विकासाच्या बाजूने कौल द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.jpg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा