निरा–शिवतक्रार व कोळविहिरेमध्ये राष्ट्रवादीचा निर्णायक विजय
निरा–शिवतक्रार व कोळविहिरेमध्ये राष्ट्रवादीचा निर्णायक विजय
शिवसेनेला मोठा धक्का, प्राजक्ता दुर्गाडेंची ‘कामातून उत्तर’ देण्याची भूमिका
नीरा
पुरंदर तालुक्यातील निरा–शिवतक्रार जिल्हा परिषद गट आणि कोळविहिरे व निरा–शिवतक्रार पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालामुळे मागील निवडणुकीत शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघांमध्ये यावेळी शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
निरा–शिवतक्रार जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांनी 13,521 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेच्या भारती अतुल म्हस्के यांना 7,803 मते मिळाली. प्राजक्ता दुर्गाडे यांनी 5,748 मतांची ठोस आघाडी घेत शिवसेनेचा पराभव केला.
पंचायत समितीच्या कोळविहिरे गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता निगडे यांनी 5,729 मते मिळवत शिवसेनेच्या शीतल साळुंखे यांचा 1,066 मतांनी पराभव केला. शीतल साळुंखे यांना 4,663 मते मिळाली.
तसेच निरा–शिवतक्रार गणात राष्ट्रवादीच्या मोनिका कांबळे यांनी 6,109 मते मिळवत भाजपच्या वंदना भोसले यांचा 2,168 मतांनी पराभव केला. वंदना भोसले यांना 3,963 मते मिळाली.
विजयानंतर प्राजक्ता दुर्गाडेंची भावनिक प्रतिक्रिया
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना प्राजक्ता दुर्गाडे यांनी प्रथम अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. “अजय दादा पवार यांच्यामुळेच हा विजयाचा गुलाल अंगावर पडला,” असे त्यांनी नमूद केले. तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त करत, पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली.
टीकेवर ‘कामातून उत्तर’ देण्याची भूमिका
प्राजक्ता दुर्गाडे या जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या कन्या आहेत. निवडणूक काळात दिगंबर दुर्गाडे यांच्यावर शिवसेनेकडून, विशेषतः आमदार विजय शिवतारे आणि माजी सभापती अतुल म्हस्के यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देणार का, असा प्रश्न विचारला असता प्राजक्ता दुर्गाडे म्हणाल्या, “आमचा स्वभाव कोणावर टीका करण्याचा नाही. सर्वांना एकत्र घेऊन काम करणे हाच आमचा मार्ग आहे. टीकेला कामातूनच उत्तर देऊ.”
मागील निवडणुकीत शिवसेनेचा गड, यावेळी राष्ट्रवादीचा झेंडा
या मतदारसंघांचा मागील निवडणुकीतील इतिहास पाहता, यावेळी झालेला पराभव शिवसेनेसाठी अधिक धक्कादायक मानला जात आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या शालिनी पवार निवडून आल्या होत्या, तर पंचायत समितीत गोरखनाथ माने आणि अतुल म्हस्के यांनी विजय मिळवला होता. संपूर्ण गण तेव्हा शिवसेनेकडे होता. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला शिवसेनेकडे गेलेला गड पुन्हा खेचून आणत मोठे यश संपादन केले आहे.
या निकालामुळे पुरंदरमधील राजकीय समीकरणे बदलत असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास वाढवणारा आणि शिवसेनेसाठी मात्र आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा हा निकाल ठरत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा