वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद, १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
बारामती | प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ९५ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून टोळीतील एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शेळी-बोकड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले होते. याची दखल घेत वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून अशोक बाबुराव जाधव याला अटक केली. या टोळीतील आणखी दोन आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या अशोक बाबुराव जाधव याच्यावर वडगाव निंबाळकर, लोणंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडील पिक-अप वाहनाची तपासणी केली असता २ तलवारी, ३ कोयते, १ लोखंडी रॉड, १ स्क्रू ड्रायव्हर, १ तार कटर, १ चाकू, १ लाकडी काठी आणि १ प्लास्टिक पाईप असा घातक मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही टोळी इतरही गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू असल्याचे वडगाव निंबाळकर पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:
Post a Comment