Monday, January 5, 2026

दर्पण ते ‘गोदी मीडिया’ : माध्यमांच्या अधोगतीचा प्रवास

 

दर्पण ते ‘गोदी मीडिया’ : माध्यमांच्या अधोगतीचा प्रवास 



मुंबई : 

      ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले. या ऐतिहासिक घटनेला उद्या १९४ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी पत्रकारितेचा तो जन्मकाळ केवळ माध्यमाचा आरंभ नव्हता, तर सामाजिक, वैचारिक आणि राष्ट्रीय जागृतीचा प्रारंभ होता. 


      दर्पण सुरू झाले तेव्हा देश पारतंत्र्यात होता. इंग्रज सत्तेच्या जोखडाखाली दबलेल्या समाजाला जागे करण्याचे, शिक्षित करण्याचे आणि अन्यायाविरुद्ध उभे करण्याचे महत्त्वाचे काम त्या काळातील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून केले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक हे पत्रकारही होते. पत्रकारिता ही तेव्हा मिशन होती, धंदा नव्हता. लेखणी ही तलवार होती आणि वृत्तपत्रे ही परिवर्तनाची रणभूमी होती. 


        स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकीय व सामाजिक रचनेत बदल झाले, तसेच माध्यमांचे प्राधान्यक्रमही बदलत गेले. लोकशिक्षण हे माध्यमांचे मूलभूत उद्दिष्ट हळूहळू मागे पडले. त्याजागी लोकरंजन आले आणि आज दुर्दैवाने माध्यमांची वाटचाल सत्तानुनय या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. 


       आज अनेक भांडवलदारी माध्यमांना सत्ताधाऱ्यांभोवती आरत्या ओवाळणे, त्यांच्या चुका झाकणे, प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे, एवढेच आपले काम असल्याचा भ्रम झालेला दिसतो. सत्तेला आरसा दाखवण्याऐवजी आरशालाच वाकवण्याचे काम माध्यमांकडून सुरू आहे. 


        यातूनच “गोदी मीडिया” ही ओळख माध्यमांना मिळाली आहे. ही ओळख कोणतेही भूषण नाही; ती लाजीरवाणी आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ही अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. 


      मात्र या अंधारातही काही आशेचे किरण आहेत. आजही असंख्य पत्रकार सत्यासाठी लढत आहेत. लोकशाही, संविधान, माध्यम स्वातंत्र्य यांचे रक्षण करण्यासाठी आपली लेखणी झिजवत आहेत. धर्मांध, फूट पाडणाऱ्या शक्तींविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत आहेत. त्यांच्यावर दबाव आहे, धमक्या आहेत, आर्थिक असुरक्षितता आहे; तरीही ते माघार घेत नाहीत. 


      अशा पत्रकारांना केवळ शुभेच्छाच नव्हे, तर समाजाच्या सहकार्याची, पाठिंब्याची नितांत गरज आहे. किमान सुबुद्ध जनतेने तरी सत्य बोलणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कारण पत्रकारिता वाचली तरच लोकशाही वाचेल. 


       पत्रकार दिनाच्या निमित्ताने या संघर्षरत, निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारांना सलाम. 


पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा! 


— एस. एम. देशमुख

मुख्य विश्वस्त

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई

---

No comments:

Post a Comment

Featured Post

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे  नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा  नीरा :   ...