लग्नाच्या आनंदात शिक्षणाची देणगी; वरात टाळून शाळा विकासासाठी नवदांपत्याचे प्रेरणादायी पाऊल
पुरंदर :
खर्चिक वरात, आहेर-भेटवस्तूंच्या ऐवजी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील नवदांपत्याने घालून दिला. लग्नाच्या निमित्ताने ज्या शाळेने आयुष्याला आकार दिला, त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी रोख देणगी देत राहुल व प्राजक्ता यांनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण सादर केले.
लग्न म्हणजे केवळ वैयक्तिक आनंदाचा क्षण नसून समाजाशी नाते जपण्याची संधी असल्याचे पिसुर्टी येथील राहुल व प्राजक्ता यांनी कृतीतून दाखवून दिले. आपल्या शुभविवाहाच्या आनंदात वरातीचा खर्च टाळत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिसुर्टी या आपल्या बालपणाच्या शाळेसाठी ₹५,००१/- इतकी रोख देणगी शाळा विकासासाठी दिली. देणगी स्वीकारताना नवदांपत्याने गुरुजनांना नमस्कार करून शुभाशीर्वाद घेतले.
राहुल हे कै. साधू भिमाजी बरकडे (पाटील) यांचे नातू व श्री. बाळू साधू बरकडे (पाटील) यांचे कनिष्ठ चिरंजीव असून, प्राजक्ता या श्री. राजेंद्र सुभाष घरबुडे यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी करमाळा येथील एकदंत मंगल कार्यालयात त्यांचा शुभविवाह संपन्न झाला. यापूर्वी रविवारी साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम पार पडला.
“आहेर व भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत” अशी स्पष्ट विनंती करत नवदांपत्याने सामाजिक भान जपले. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, शिक्षकवर्ग व शिक्षणप्रेमींनी कौतुक केले असून, विवाह समारंभातून समाजोपयोगी कार्याचा नवा पायंडा पडल्याची भावना व्यक्त होत आहे.



No comments:
Post a Comment