बारामती अजित पवार शरद पवार एकत्र नाही : टक्कर होणार
बारामती नगरपरिषद निवडणूक :
महाविकास आघाडी एकत्र; बारामतीकरांनी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी – युगेंद्र पवार
बारामती
बारामती नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी आज (17 नोव्हेंबर) रोजी बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. आज उमेदवारी दाखल करण्याचा हा शेवटचा दिवस असून आमच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच काही अपक्षांनीही सहभाग जाहीर केला असल्याचे ते म्हणाले. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना, काँग्रेस, वंचित आणि इतर अपक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक आपण लढणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत बोलताना पवार म्हणाले की, या पदासाठी दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत. सर्व चाचपणी पार पडल्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांत नाव जाहीर केले जाईल. बारामती शहरात अनेक समस्या असल्याचे नमूद करताना ते म्हणाले की, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, वाहतूक कोंडी, अपघात वाढ, घरपट्टी आणि पाणीपट्टीचे महाग दर, तसेच नगरपालिकेतील भ्रष्टाचार ही निवडणुकीतील अत्यंत महत्त्वाची मुद्दे असतील. “आतापर्यंतच्या काळात नगरसेवकांना प्रत्यक्ष काम करण्याचा अधिकारच राहिला नाही, केवळ सह्या करण्याचा अधिकार ठेवला गेला. लोकशाही बारामती नगरपालिकेत उरलेली नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
नवीन उमेदवार आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. “आम्ही जास्तीत जास्त तरुणांना संधी देत आहोत. साहेबांनी देखील जाहीर केले आहे की 50 टक्के पेक्षा जास्त जागा तरुणांना दिल्या जातील. आमचे उमेदवार सर्वसामान्य लोकांतले, सेवक वृत्तीचे आणि उच्चशिक्षित असतील. ठेकेदार, बिल्डर किंवा पैशाची ताकद वापरणारे लोक नव्हेत,” असे पवार यांनी स्पष्ट केले. काही प्रभागांमध्ये एक अनुभवी आणि एक तरुण चेहरा अशी सांगड घालून निवडणूक लढवली जाईल असेही त्यांनी सांगितले.
बारामतीतील मतदारांमध्ये पूर्वी प्रचलित असलेल्या “लक्ष्मी दर्शन” संस्कृतीवर टीका करताना युगेंद्र पवार म्हणाले, “बारामतीकरांचे लक्ष्मी दर्शन झाले नाही तर बाहेर पडत नव्हते, पण गेल्या पन्नास वर्षांत परिस्थिती बदलली आहे. बारामतीकर शिक्षित आणि जागरूक झाले आहेत. दोन हजार, पाच हजार रुपयांच्या आमिषापायी बारामतीचे भविष्य विकू नका.” बारामती नगरपालिकेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी बारामतीकरांनी स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना एक संधी द्यावी असे आवाहन केले.
अजित पवारांच्या विधानांवर भाष्य करताना त्यांनी वाद टाळत म्हटले, “ते ज्येष्ठ आहेत, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही. पण तुम्ही 25 वर्षे संधी दिलीत, आता आम्हाला फक्त पाच वर्षे देऊन बघा. पाच वर्षांनंतर बारामतीत काय बदल होतो ते पाहाल.” त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, बारामतीकर पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवतील. अजित पवार गटाकडून कार्यकर्ते फोडल्याच्या आरोपांवर ते म्हणाले की, सर्वांना राजकीय स्वातंत्र्य आहे. काही आमच्याकडून गेले असतील तर तिकडचेही दोन-चार कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत.
प्रचारासाठी महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक बारामतीत येणार असून त्यांच्या सूचनेनुसार प्रचारकांना बोलावले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. बारामतीसाठीचे जागावाटप साहजिकच मोठा वाटा शरद पवार साहेबांच्या पक्षाकडेच असेल कारण बारामती त्यांचेच गाव आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सत्ता व विरोधक दोघेही हवेत. कौन्सिल हॉलमध्ये ठोस चर्चा, प्रश्न आणि उत्तरं झाली पाहिजेत,” असे त्यांनी मत मांडताना सांगितले.
पत्रकार परिषदाच्या शेवटी त्यांनी पुन्हा एकदा आवाहन करत म्हटले, “बारामतीकरांनी आपले मत विकू नये. फक्त पाच वर्षांच्या टर्मवर तुमचे भविष्य अवलंबून असते. बारामतीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, पाणी, गटारी, रस्ते, वाहतूक, करप्रणाली, भ्रष्टाचार यावर निर्णय घ्यायचा असेल, तर नवीन चेहऱ्यांना संधी दिलीच पाहिजे.”

Comments
Post a Comment