"महिलांनी घरापुरत्याच मर्यादित न राहता आत्मनिर्भर व्हावे" — सरपंच तेजश्री काकडे
महिलांच्या सबलीकरणासाठी ग्रामपंचायतीकडून मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण
"महिलांनी घरापुरत्याच मर्यादित न राहता आत्मनिर्भर व्हावे" — सरपंच तेजश्री काकडे
नीरा दि. 17
घर, संसार आणि शेतीकामात खांद्याला खांदा लावून परिश्रम करणाऱ्या महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करता यावी, या उद्देशाने नीरा ग्रामपंचायतीने गावातच महिलांसाठी चारचाकी मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण सुरू केले आहे. हे प्रशिक्षण ग्रामपंचायत नीरा शिवतक्रार आणि श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्थेच्या सहकार्याने राबविले जात असून, प्रशिक्षणासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी वापरला जात आहे.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना सरपंच तेजश्री काकडे म्हणाल्या,
"गावात महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी कमी प्रमाणात मिळते. त्या घरकाम आणि शेतात इतक्या गुंतलेल्या असतात की आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांना पर्याय कमी उपलब्ध होतो. म्हणूनच त्यांच्या प्रगतीसाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. भविष्यात महिलांनी वाहनचालक म्हणून स्वतःचा उदरनिर्वाह करावा किंवा घरातील वाहन स्वतः चालवून स्वावलंबी व्हावे, ही आमची अपेक्षा आहे."
उद्घाटन कार्यक्रमात उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्या वैशाली काळे, शशिकला शिंदे, सदस्य अभिषेक भालेराव, अनंता शिंदे, विजय शिंदे, संस्थेचे अध्यक्ष पंकज साबळे, तसेच शिवसमर्थ ड्रायव्हिंग स्कूलचे रुपेश पवार आणि मारुती ड्रायव्हिंग स्कूलचे यशवंत भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधा माने, आणि आभार प्रदर्शन अभिषेक भालेराव यांनी केले.
या प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सुमारे ९० महिलांनी नोंदणी केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी रमेश राऊत यांनी दिली. प्रशिक्षणाची प्रत्यक्ष सुरुवात बुधवारपासून होणार आहे.


Comments
Post a Comment