सासवड नगर नगरपरिषदेसाठी भाजपाचा उमेदवार ठरला
सासवड नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून आनंदीकाकी जगताप यांना उमेदवारी
सासवड | प्रतिनिधी
सासवड नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपने माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सासवड येथे आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. माजी आमदार संजय जगताप यांच्या मातोश्री असलेल्या आनंदीकाकी जगताप यांनी यापूर्वीही नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, स्व. सहकारमहर्षी चंदूकाका जगताप यांच्या त्या पत्नी आहेत.
संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप सासवड नगरपरिषदेसाठी प्रथमच संघटित शक्तीने निवडणूक लढवत आहे. या पार्श्वभूमीवर आनंदीकाकी जगताप यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, माजी राज्यमंत्री व शिंदे गटाचे नेते आमदार विजय शिवतरे यांनी या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. त्यामुळे सासवडमध्ये महायुती आघाडीतील मित्रपक्ष आमने-सामने येणार असून, लढतीत अनिश्चितता वाढली आहे. या स्थानिक निवडणुकीकडे आता राज्यस्तरावरूनही उत्सुकतेने पाहिले जात आहे.
पक्ष नेत्रृत्वाने आनंदीकाकी जगताप यांच्यावर विश्वास दाखविल्यानंतर सासवड भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. आगामी दिवसांत प्रचाराची दिशा आणि महायुतीतील समीकरणे सासवडची निवडणूक रंगतदार करणार आहेत.

Comments
Post a Comment