कार्यक्रम निमंत्रणाचा स्विकार, होकार देऊनही गैरहजर राहिलेल्या मंत्र्यांचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मानले आभार
मुंबई :
मा.संजयजी शिरसाट आणि मा. मेघना बोर्डीकर मॅडम...
सप्रेम नमस्कार
आपण दोघांनाही सेलुतील पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी वेळ दिला नाही.. त्याबद्दल आपले मनापासून आभार. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दलची ही अनास्थाच दाखवून देते की, आपल्याला जनसामांन्यांबद्दलही जराही कळवळा नाही.. अर्थात आपण आला नाहीत तरी आपली कोणतीही उणीव आम्हाला जाणवली नाही, कोणी आपली आठवण काढली नाही, मंत्री का आले नाहीत अशी विचारणाही कोणी केली नाही की, मंत्री नाहीत म्हणून कोणी वाईट वाटूनही घेतलं नाही. आपण नसतानाही आमचा कार्यक्रम फारच देखणा, सुरेख, अविस्मरणीय झाला.. खरं म्हणजे "पत्रकारांच्या कार्यक्रमास मंत्र्यांना बोलवताच कामा नये या मताचा मी आहे", परंतू संघटना चालवताना अनेकदा आपल्या आवडी-निवडी, आपली मतं बाजुला ठेवत तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळं आपल्याला निमंत्रित करावं लागलं होतं. आमचे पदाधिकारी दोन वेळेस आपल्याला भेटायला संभाजीनगरला आले. एकदा वेळ घ्यायला, पुन्हा निमंत्रण द्यायला. दोन्ही वेळेस "नक्की येतो" असा शब्द आपण दिलात. मग सेलुत बॅनर लागले, बातम्या येत राहिल्या, निमंत्रण पत्रिकेवर फोटो, नावं छापली गेली. पंधरा दिवस मनसोक्त फुकटची प्रसिध्दी आपल्याला मिळाली. आपला हेतू साध्य झाला असावा नंतर आपण कार्यक्रमाकडे पाठ फिरविली का? पत्रकारांना घाबरलात? की, पत्रकारांसमोर बोलण्यासारखं आपल्याजवळ काही नाही याची जाणीव झाली? की आपण पत्रकारांना गृहित धरता? तुमच्या डोक्यात नेमकं काय होतं माहिती नाही. पण आपण आला नाहीत. आमचं काय अडलं ? काहीच नाही. कार्यक्रम मस्तच झाला, नुकसान आपलंच झालं. कणकवली ते नागपूर, चंद्रपूर, मुंबई - ते मुखेड, आणि नंदूरबार ते उदगीर पर्यत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो पत्रकार सेलूत आले होते. महोदय, तुम्ही ठरवलं, कितीही खोके रिकामे केले तरी तुम्हाला ८०० पत्रकार एकत्र जमा करता येणार नाहीत. समाजातील एक महत्वाचा घटक असलेल्या पत्रकारांसमोर अगदी फुकटात व्यक्त होण्याची सुवर्णसंधी आम्ही आपणास उपलब्ध करून दिली होती ती आपण नाहक गमावलीत. एक गोष्ट लक्षात असू द्या. सेलू मेळाव्यासाठी जे पत्रकार आले होते ते मंत्री संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर यांची नावं वाचून किंवा त्यांचे अमोघ विचार(?) ऐकण्यासाठी आलेले नव्हते. मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची अशी एकमेव संघटना आहे की, वक्ता कोण आहे हे पाहून पत्रकार येत नाहीत तर "मराठी पत्रकार परिषद" या नावाला असलेल्या वलयातून, संघटनेवरील प्रेमापोटी पत्रकार कार्यक्रमास येतात. म्हणूनच परिषदेचे सर्वच कार्यक्रम भरगच्च होतात. काल सेलूचे श्री साई नाट्य मंदिर देखील ओसंडून वाहत होते. हॉल भरला, बाल्कनी भरली, मग अतिरिक्त खुर्च्या टाकाव्या लागल्या. ही मराठी पत्रकार परिषदेची ताकद आहे. ती अनुभवण्याची संधी आपण सोडलीत. कार्यक्रमास मंत्री आले की, ते पत्रकारांना सल्ले देऊन झाले की निघून जातात, पत्रकारांच्या व्यथा, अडचणी, दु:ख ऐकणयाचीही त्यांची तयारी नसते. चालू कार्यक्रमातून लवाजम्यासकट ते निघाले की, गोंधळ, उडतो, कार्यक्रम विस्कळीत होतो. आपण न आल्यामुळे सेलूच्या कार्यक्रमात असं काही झालं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत एकही पत्रकार जाग्यावरून उठला नाही. त्यामुळे व्यवस्थित भाषणं झाली, पुरस्कार वितरणही व्यवस्थित झालं. त्याबद्दलही आपले आभारच मानावे लागतील. एकमात्र नक्की, पत्रकार संघटनांच्या कार्यक्रमांना मंत्र्यांना बोलवायचे की नाही याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. "ज्या लोकांना पत्रकारांसाठी वेळ नाही, अशा लोकांशी पत्रकारांचे ही काही घेणे-देणे नाही" हे ठणकावून सांगावे लागणार आहे. पुढील महिन्यात मराठी पत्रकार परिषदेच्या होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत यावर नक्की विचार केला जाईल, चर्चा होईल आणि एकमताने ठोस निर्णय घेतला जाईल.
-एस.एम.देशमुख