Type Here to Get Search Results !

"पत्रकारांच्या प्रश्नासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार" मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचा इशारा.

"पत्रकारांच्या प्रश्नासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार" मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचा इशारा. 

सेलू येथे आदर्श जिल्हा, तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा उत्साहात




मुंबई, प्रतिनिधी दि.१ फेब्रुवारी २०२५ : 'पत्रकारांच्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. अखेर सरकारने २०१७ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा केला. पण प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. कारण या कायद्याचे नोटिफिकेशन निघाले नाही. पत्रकार संरक्षण कायद्यासह सरकार पत्रकारांच्या इतर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार आहे,' असा इशाराच परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिला. 




मराठी पत्रकार परिषद आयोजित  रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा परभणी जिल्ह्यातील सेलू येथे एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, प्रमुख वक्ते तथा प्रसिद्ध निवेदक विशाल परदेशी, स्वागताध्यक्ष विनोद बोराडे, परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूर शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई जयपूरकर,  डिझिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, विभागीय सचिव रवी उबाळे, सचिन शिवशेट्टे, अशोक काकडे, उप विभागीय अधिकारी संगीता सानप,माजी नगराध्यक्ष हेमंत आढळकर, परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, परभणी जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास, सेलू तालुका पत्रकार संघ अध्यक्ष लक्ष्मण बागुल यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले पत्रकार उपस्थित होते. 




'राज्य सरकारने पत्रकारांसाठी  पेन्शन योजना सुरू केली. आरोग्य योजना सुरू केल्या. पण प्रत्यक्षात या योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी येत आहेत,' असे सांगतानाच देशमुख म्हणाले, 'समाजाच्या पत्रकारांकडून १०० अपेक्षा करतात. पण अडचणीच्या वेळात समाजाने देखील पत्रकारांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा असते. मात्र पत्रकाराच्या अडचणीच्या काळात कोणी उभे राहत नाही. पण यापुढे  महाराष्ट्रातील एकही पत्रकार एकाकी पडणार नाही, यासाठी मराठी पत्रकार परिषद काम करीत आहे. तशी रचनाच आपल्या संघटनेची आहे. मराठी पत्रकार परिषद ग्रामीण भागात पुरस्कार वितरण सारखे उपक्रम घेण्यामागे मोठा उद्देश आहे. कारण ग्रामीण जीवन, संस्कृती, प्रश्न यासर्वाची जाण पत्रकारांना होणे महत्त्वाचे आहे.  राज्यातील ३५६ तालुक्यात आपल्या परिषदेचे अस्तित्व आहे. सामाजिक बांधीलकी जपत परिषद काम करीत आहे. पण ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न तितक्याच ताकतीने मानण्याचे काम आता करणे गरजेचे असून याबाबत लवकरच परिषद भूमिका जाहीर करेल,' असेही देशमुख यांनी सांगितले. 


देशमुख पुढे म्हणाले, 'पत्रकार अधिस्वीकृतीचे नियम ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी खूप कडक आहे. याबाबतीत विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच पत्रकारांच्या हक्काची चळवळ पुढे नेण्यासाठी आगामी काळात अधिक व्यापकतेने, जोमाने परिषद काम करेल,' असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.



*पत्रकारिता क्षेत्रात काम करताना माणसे जोडा* 


याप्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे विशाल परदेशी यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना माणसे जोडा,' असा मोलाचा सल्ला देत सांगितले की, 'आजच्या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा विविध भागातून पत्रकार आलेत. मराठी पत्रकार परिषद या मातृसंस्थेच्या एक भाग आहे, याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागातील पत्रकाराकडे जेवढी माहिती असते, तेवढी शहरी भागातील पत्रकारांना नसते. चांगला फिल्ड रिपोर्टर हा उत्तम अँकर होऊ शकतो. बेधडकपणे व्यक्त होण्यास प्राधान्य द्या. असे बोला जे तुमच्या आईला समजेल, असे प्रश्न विचारा जे तुमच्या आईला समजतील. आयुष्यात आपल्याला जमिनीवर आणणारी माणसे असावीत. तरच माणूस माणसात जाऊन उत्तम मिसळू शकेल. पत्रकारिता क्षेत्रात प्रत्येक क्षण स्पर्धेसारखा असतो, आणि या स्पर्धेत आपण टिकणे गरजेचे आहे. पण आपण कोणतीही बातमी देताना शब्दांचे भान फार महत्त्वाचे आहे. घरातील महिला जेव्हा घर सांभाळते, तेव्हाच पत्रकारीतेचे व्यसन पूर्ण होऊ शकते. तसेच पत्रकारिता करताना आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. ब्रेकिंग न्यूज मिळवण्याच्या नादात नाही ते धाडस ते करू नका. धाडस कोणत्या गोष्टीचे करावे, हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. स्वतः ला जपा, कुटुंबाला जपा.कारण आपले कुटुंब आहे तरच आपण आहोत,' असेही परदेशी यांनी सांगितले. 


मिलिंद अष्टीवकर म्हणाले की,'मराठी पत्रकार परिषद १०० वर्षाकडे वाटचाल करीत आहे. पत्रकारांसाठी ग्रामीण भागात कार्यक्रम घेतल्याने तेथील पत्रकारांना एक बळ मिळते.' 


राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचे स्वागत याप्रसंगी स्वागताध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परभणी जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास यांनी तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. आभार रेवणआप्पा साळेगावकर यांनी मानले. 


..... 


चौकट -१ 


*असे आहेत पुरस्कार प्राप्त पत्रकार संघ* 


मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा स्व. वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ जिल्हा पुरस्कार अकोला जिल्हा पत्रकार संघाला देण्यात आला. तर आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार कणकवली तालुका पत्रकार संघ (कोल्हापूर विभाग), बुटीबोरी तालुका पत्रकार संघ (नागपूर विभाग), सेलू तालुका मराठी पत्रकार संघ (छत्रपती संभाजीनगर विभाग), पिंपरी चिंचवड तालुका पत्रकार संघ (पुणे विभाग), शहादा तालुका पत्रकार संघ (नाशिक विभाग) ,  उमरगा तालुका पत्रकार संघ ( लातूर विभाग), खामगाव प्रेस क्लब (अमरावती विभाग) ,  चिपळूण तालुका पत्रकार संघ (कोकण विभाग) यांना देण्यात आला.

...... 


चौकट -२ 


*विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांचा कार्यगौरव* 


पत्रकारिता क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सेलू येथील कार्यक्रमांमध्ये गौरव करण्यात आला. यामध्ये आसारामजी लोमटे (साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार),  डी व्ही मुळे (ज्येष्ठ पत्रकार), कांचनजी कोरडे (ज्येष्ठ पत्रकार) यांचा गौरव केला गेला. तर, सेलू येथील तरुणी शेख अलिना शेख मुनीर हिची इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies