Type Here to Get Search Results !

छंद व कला आनंदी जीवनाचा मंत्र - प्रदीप कोथमिरे

 छंद व कला आनंदी जीवनाचा मंत्र - प्रदीप कोथमिरे "आयुष्यात माणूस भौतिक सुख, संपत्ती द्वारे सहजपणे मिळवू शकतो परंतु माणसाच्या जीवनात खरे समाधान आणि आनंद मिळविण्यासाठी एखादा चांगला छंद व कला जोपासणे गरजेचे आहे" असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते प्रदीप कोथमीरे यांनी केले. विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बारामती व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा, सांस्कृतिक व विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आवड, प्रामाणिक प्रयत्न व निष्ठापूर्वक साधना करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव अँड. नीलिमाताई गुजर होत्या. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी वर्षभरात राबविलेल्या विशेष उपक्रमांचा आढावा घेऊन विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रेसर आहे असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.अभिजीत कुलकर्णी व विद्या प्रतिष्ठान संस्थेचे रजिष्ट्रार श्रीश कंभोज व्यासपीठावर उपस्थित होते, त्यांच्या हस्ते  

वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम कलाविष्कार, जिल्हास्तरीय, विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या 'पाऊसपाड्या' या एकांकिकेतील सहभागी विद्यार्थी इम्रान तांबोळी, सुजल बर्गे, पूनम धोंडे व इतर कलाकारांचा आणि दिग्दर्शक आदेश यादव यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर विशेष नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. 

भारत सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यास च्या वतीने पुणे येथे आयोजित पुस्तक महोत्सवात लोकनृत्य सादर केलेल्या कलाकारांचाही गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ' श्रीमती नीलिमताई पवार सुवर्ण पदकासाठी' प्रशंसा प्रमाणपत्र प्राप्त अनामिका भरत चांदगुडे हिस गौरवण्यात आले. 

याबरोबरच ग्रंथ वाचन स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने आयोजित केलेल्या 'मेरी माटी मेरा देश' या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्हास्तरीय व विद्यापीठ स्तरीय यशस्वी विद्यार्थी, सायबर सुरक्षा पथनाट्य स्पर्धा, करिअर संसद, स्वयंसिध्दा, अविष्कार, स्वररंग 2023 विभागीय स्तर व विद्यापीठ स्तर, रोटरी क्लब ऑफ बारामती आयोजित मास्टर शेफ स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्तरावर सहभागी होऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. राष्ट्रीय खेळाडू म्हणून सन्मानित केलेलीखो खो खेळाडू प्रांजल मडकर, रोड रेस क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचे नेतृत्व करणारी राधिका दराडे, पॉवर लिफ्टिंग व बेंच प्रेस राष्ट्रीय खेळाडू सानिका मालुसरे,आर्चरी प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू ऋतुजा घाटे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कबड्डी खोखो बॅडमिंटन व विविध क्रीडा प्रकारात महाविद्यालयाचे जिल्हास्तर,विभागीय स्तर,विद्यापीठ स्तरावर, राज्यस्तरावर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. 

 विद्यादीप या महाविद्यालयाच्या नियतकालिकाच्या २७ व्या अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभानंतर लोकनृत्य, वैयक्तिक नृत्य, मूकनाट्य व पाऊसपाड्या या एकांकिकेने सर्व उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सर्व उपस्थितांचे स्वागत सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी डॉ.हणमंतराव पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. राजकुमार कदम यांनी करून दिला. सांस्कृतिक विभागाचे अहवाल वाचन डॉ.नेताजी करळे व डॉ. अमर भोसले यांनी केले. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे वाचन डॉ. दिनेश सरोदे व प्रा. किशोर ढाणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य शामराव घाडगे, डॉ लालासाहेब काशीद प्रा.नीलिमा पेंढारकर, प्रा. विजय काकडे , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भगवान चौधर, अँड तुषार झेंडे पाटील, सांस्कृतिक व क्रीडा समितीतील सर्व सदस्य तसेच शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी, पालक व प्रेक्षक मोठ्या संख्येने गदिमा सभागृहात उपस्थित होते. प्रा. राजेंद्र वळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंदा गांगुर्डे व प्रा. तुषार जगताप यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies