धक्कादायक प्रकार
'पन्नास द्या नाहीतर वाहन जाऊ देणार नाही, माघारी फिरा'नीरा वाल्हा दरम्यान रेल्वेच्या कामामूळे वाहनचालकांना मनस्ताप.
पुरंदर : पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा वाल्हे दरम्यानच्या रेल्वे गेटचे काम गेली दोन दिवस सुरू आहे. रेल्वे विभागाने सुचवलेल्या पर्यायी मार्ग लांबपल्याचा असल्याने चारचाकी व दुचाकी स्वार रेल्वे लाइनच्या शेजारील माळरानातून मार्ग काढत आहेत. मात्र याच संधीचा फायदा स्थानिकांने घेत आता प्रती वाहन पन्नास रुपये वसुली सुरू केली आहे. त्यामुळे नीरा वाल्हा दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
शनिवारी सकाळी सात ते रविवारी सायंकाळी सात पर्यंत रेल्वे गेटच्या कामा निमित्त वाल्हा नीरा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याचे पत्र स्थानिक ग्रामपंचायत, एसटी महामंडळ, पोलीस प्रशासन यांना दिली होती. प्रसिद्धी माध्यमांनी आठवडाभरापासून याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनाने जेजुरी वाल्हा बाजुने येणाऱ्या वाहनांना कोठे ही बॅरिकेट न लावल्याने वाहन थेट रेल्वे गेट समोर येत आहे. ऐन वेळी पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालक रेल्वे गेट शेजारुन माळरानातून वाहने दामटत आहेत. याचा फायदा स्थानिक घेत आहेत. टॉवर लाईन खाली एक व्यक्ती स्वतःची दुचाकी आडवी लावून कच्च्या रस्त्यावर दगडी ठेऊन वाहनचालकांना पैशांची मागणी करत आहे. पैसे न दिल्यास 'वाहन जाऊ देणार नाही, माघारी फिरा' असा सज्जड दम देत आहे.