Type Here to Get Search Results !

मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्याबद्दल सरकारच्या विरोधात रायगड प्रेस क्लबचे ९ ऑस्टला 'बोंबाबोंब आंदोलन'

 मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्याबद्दल सरकारच्या विरोधात रायगड प्रेस क्लबचे ९ ऑस्टला 'बोंबाबोंब आंदोलन'

संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाकण नाका ते कासू दरम्यानच्या महामार्गावर पत्रकार धडकणार

मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांत होडी फिरवून व खड्ड्यांविषयी भजन गात करणार अनोखे आंदोलन







रायगड : प्रतिनिधी 

       कोकणची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था, गेल्या १३ वर्षांत मंत्री व लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांच्या हिंदोल्यावर झोका घेत असलेली व महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेली जनता आणि असे असतांनाही केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने या महामार्गाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष या सर्वांची बाबींचा निषेध करण्यासाठी दोन्ही सरकार मधील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात मुंबई गोवा महामार्गावर उतरून बोंबाबोंब करणारे अनोखे आंदोलन रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची एक प्रमुख संघटना असलेल्या रायगड प्रेस क्लब कडून ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी करण्याचे ठरविण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाकण नाका ते कासू दरम्यानच्या महामार्गावर उतरून जिल्ह्यातील पत्रकार हे आगळेवेगळे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आदि उपस्थित राहणार आहेत. 

      या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन क्लबशी संलग्न असलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या वतीने नागोठण्यात करण्यात आले होते. या बैठकीत आगामी आंदोलनाच्या संदर्भात विविध विषय व मुद्द्यांवर चर्चा करण्यात येऊन आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात आले. यामध्ये भजन किर्तन (रस्त्यावर पडलेल्या खड्यावर गाणी गाऊन), होडी, मासेमारीचा पाग आणि खड्यातले हांड्यात पाणी घेऊन महिला अशा स्वरूपाचे हे आंदोलन असेल.

       या बैठकीला रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, सचिव अनिल मोरे, उपाध्यक्ष संजय मोहिते, खजिनदार दर्वेश पालकर, माजी अध्यक्ष विजय मोकल, सहसचिव पद्माकर उभारे, सह संघटक निशांत पवार, प्रेस क्लबचे प्रसिद्धी प्रमुख संजय भुवड, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कमलेश ठाकूर, सदस्य गौतम जाधव, नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, सचिव अनिल पवार, सुधागड प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद भोईर, रवींद्रनाथ ओव्हाळ, कमलेश सुतार, ॲड. सुशील गायकवाड, अजय गायकवाड आदि यावेळी उपस्थित होते. 

       मुंबई  गोवा महामार्गवर कासू ते कोलाड दरम्यान जे खड्डे पडले आहेत ते खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करावा यासाठी रायगड प्रेस क्लबकडून काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दासगाव-महाड येथे निवेदन देण्यात आले होते.  या निवेदनामध्ये ३१ जुलै पर्यंत हे खड्डे बुजवावे अन्यथा ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी रायगड प्रेस क्लबच्या वतीने वाकण नाक्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदना मार्फत देण्यात आला होता. मात्र असे असूनही जनतेशी काहीही देणे-घेणे नसलेल्या या दोन्ही सरकारने व येथील लोकप्रतिनिधींनी आपल्या निवेदनाची कोणतीच दखल घेतली नाही. सद्यस्थितीत तर या महामार्गाची महाकाय खड्ड्यांमुळे भयानक दुरावस्था झाली असून महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वाहने अडकून पडून दररोज अपघात होत आहेत व वाहनांची तोडमोडही होत आहे.  मात्र असे असूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलन करण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लबकडून घेण्यात आला आहे. 






___________________________________________________


मंत्री,  लोकप्रतिनिधी व प्रशासनावर पत्रकार करणार एस.एम.एस. चा मारा.

      रायगड प्रेस क्लब कडून विविध प्रकाच्या अनोख्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकार महामार्गावरील हे आंदोलन करणार असून त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची ही शोकांतिका आंदोलनकर्ते पत्रकार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, रायगडचे खासदार सुनील तटकरे, खा. श्रीरंग बारणे यांना दुरावस्थेबाबत एस.एम.एस. चा मारा करून लक्ष वेधणार असल्याचेही नागोठण्यातील बैठकीत ठरविण्यात आले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies