काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द
नवी दिल्ली दि.२४
देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. सूरत येथील कोर्टाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. त्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. राहुल गांधी आज सकाळी लोकसभेत आले. त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी करत काँग्रेस खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये धाव घेतल्याने गोंधळ उडाला. काही वेळाने लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. काँग्रेसने आज देशाच्या राजधानीत मोठ्या आंदोलनाची योजना आखली होती. त्याचवेळी आज सकाळी संसदेतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात विरोधकांची बैठक झाली होती.