औरंगाबाद - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सोमवारी (दि. २ जानेवारी) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार असून, भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार आहे.
भागवत कराड यांनीही औरंगाबाद
लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता
असून पक्षाने आदेश दिल्यास मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले. तसेच, औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद या चारही जागांवर भाजपचा दावा केला
आहे. शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचे १३ खासदार शिंदे गटात दाखल झाले
आहेत. तर, इतर खासदार आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत.
त्यामध्ये, परभणीचे खासदार बंडू जाधव आणि उस्मानाबादचे खासदार ओमराजे
निंबाळकर हे ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे, या दोन्ही जागांवर भाजपने
निवडणुकीसाठी दावा केला आहे. तर, औरंगाबाद येथील जागेवर सध्या
एमआयएमचे खासदार आहेत. त्यामुळे, या तीन आणि हिंगोलीच्या जागांवर
सध्या भाजपने लक्ष केंद्रीत केल्याचे भागवत कराड यांनी सांगितले.
भाजपकडून आगामी लोकसभा
निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्यातच, महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या
क्रमांकाचं लोकसभा सदस्य असलेलं राज्य आहे. त्यामुळे, भाजपचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. देशातील १४४ लोकसभा
मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. राज्यात शिवसेनेकडे असलेल्या १८
जागांसाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. देशात भाजपने ४०० जागा लढविण्याचा निश्चय केला
आहे. त्याचे नियोजन म्हणून अनेक केंद्रीय मंत्र्यांना विविध लोकसभा मतदारसंघ
संघटनात्मक मजबुतीसाठी वाटून दिले आहेत. मराठवाड्यात औरंगाबादसह, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा
लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे.
नड्डांच्या सभेला सहा मतदारसंघातील पदाधिकारी
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजप
लढणार असून, सभेला सहा विधानसभेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपप्रेमी, नागरिक उपस्थित राहतील, अशा व्यवस्था केली आहे. रविवारी
सायंकाळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड, सहकार
मंत्री सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सभास्थळाची पाहणी करीत तयारीचा
आढावा घेतला
असा असेल नड्डांचा दौरा
अध्यक्ष नड्डा २ जानेवारी रोजी
घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. त्यांच्या हस्ते वेरूळ येथील अहिल्यादेवी
कुंडाच्या सौंदर्यीकरणाचा व साउंड व लाईट शोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तेथून
ते सभेसाठी शहरात येतील. सभेनंतर वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तीन अशा सहा मतदारसंघांतील भाजप कोअर
कमिटीची ते बैठक घेतील. नंतर शहरातील महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करणार
आहेत.