Type Here to Get Search Results !

माईक बंद केला तरी कानठळ्या बसवूनच राहिन; संसदेबाहेरच अमोल कोल्हे कडाडले

 


 छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार होणाऱ्या अपमानाचा  मुद्दा मांडताना संसदेत खासदार अमोल कोल्हे यांचा आज (8 डिसेंबर) माईक बंद करण्यात आला.

त्यामुळे अमोल कोल्हे चांगलेच संतापले. माईक बंद केला तरी शिवरायांच्या भक्ताचा आवाज सहज बंद करता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा मांडण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांना वेळ देण्यात आला होता. मात्र दोन तीन वाक्य बोलल्यानंतर त्यांचा माईक बंद करण्यात आला. त्यामुळे अमोल कोल्हे चांगलेच संतापले होते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी यापुढे कोणीच अवमानकारक भाष्य करु नये, यासाठी ठोस कायद्याची तरतूद व्हावी. हा मुद्दा अमोल कोल्हेंनी संसदेत मांडायला सुरुवात केली होती. मात्र त्याआधीच त्यांचा माईक बंद करण्यात आला. आमचा माईक बंद केला तरी आमच्या भावना आणि आमचा आवाज तुम्ही कदापि बंद करु शकणार नाही. तो कानठळ्या बसवूनच राहिन असा इशारा कोल्हे यांनी थेट संसदेबाहेरुनच दिला.

'महापुरुषांचा अवमान करण्याची हिंमत कोणाचीही होऊ नये'

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची कोणाचीही हिंमत होऊ नये. घटनात्मक पदावर किंवा जबाबदारीच्या पदावर असलेल्यांची देखील हिंमत होऊ नये, यासाठी संसदेने कायद्यात ठोस तरतूद करावी. शिवाजी महाराजच नाही तर सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीत असा कायदा करावा, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी अनेक वक्तव्य करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करणारं विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये त्यांचा निषेध करण्यात आला. राज्यपालांना हटवा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून राज्यपालांना हटवण्याचा विचार दिसत नाही आहे. दोन दिवसांपूर्वी महपरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल चैत्यभूमीवर एकत्र अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यामुळे राज्यपालांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत.

पुण्यातील सर्वपक्षीय नेते आणि संस्था आक्रमक

पुण्यातील सर्वपक्षीय नेते आणि सर्व सामाजिक संस्था राज्यपालांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्यासोबत पिंपरी-चिंचवडमध्येही आज बंद पुकारला आहे. या बंदला संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यातदेखील 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट यांनी वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करत निषेध नोंदवला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies