Sunday, December 25, 2022

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून आल्यावर....; देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती


 नागपूर, 26 डिसेंबर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्नाटकच्या मुद्द्यावरती विरोधक आणि सत्ताधारी एकच आहेत.

त्यामुळे कोणताही वाद निर्माण करू नये. लक्ष्यवेधी तास सुरू असताना विरोधी पक्षाशिवाय कुणाला बोलू दिले जात नाही. मात्र, विषय लक्षात घेता इतर सदस्यांना देखील बोलू दिले जावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान खाली घालतील, असं होणार नाही.

कोणाच्या बापाची हिंमत नाही. एक एक इंच जमिनीसाठी आपण सगळीकडे लढलो. सुप्रीम कोर्टात लढतो आहोत. मात्र, इतर कुठेही लढायला लागले तरीही लढू.

मात्र, आपण सीमा प्रश्नावरती भागातील मराठी माणसाच्या मागे आहोत, असेही ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र सरकार कर्नाटक सीमवाद संदर्भात ठराव मांडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेलेले आहेत. जर मुख्यमंत्री लवकर आले तर आज हा ठराव मांडू किंवा उद्या ठराव मांडू, अशी महत्त्वाची माहिती दिली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केले होते खळबळजनक वक्तव्य - मागच्या महिन्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील 40 गावे आमच्याकडे येणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. यावरून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. यानंतर पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही आमचाच भाग असल्याचे सांगितले. यावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे.

यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यातील वातावरण तापले आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये घेतलं होतं देवेंद्र फडणवीसांचं नाव - 'महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे.

कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आतापर्यंत यश आलं नाही आणि यापुढंही ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत', असं ट्वीट बोम्मई यांनी केलं होतं.

No comments:

Post a Comment

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...