गेल्या सहा दशकांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी 'पद्मश्री' सुलोचना चव्हाण यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या.
मुलगा विजय
चव्हाण यांनी त्यांना मुखाग्नी दिला. चाहत्यांसह राजकीय आणि कलाक्षेत्रातील
दिग्गजांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या निधनामुळे लावणीचा
अभिजात सूर हरपल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होत आहे.
तमाशा
फडातील लावणी घराघरात पोहोचवण्यात ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे
मोलाचे योगदान होते. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्यांनी ठसकेबाज स्वरात लावण्या
सादर केल्या. गेल्या काही दिवसांपासून सुलोचनाबाईंची प्रकृती खालावली होती.
शनिवारी सकाळी फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या
पश्चात मुलगा,
सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बहारदार लावण्यांची मैफल संपली, उद्धव ठाकरे
यांची आदरांजली
'सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने लावणी गायकीतला
तडफदार आवाज हरपला. बहारदार लावण्यांची मैफल संपली. महाराष्ट्राच्या चित्रपट व
सांस्कृतिक जगताची हानी झाली,' अशा
शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुलोचनाबाईंचा तडफदार आवाज जणू 'लावणी' गायनासाठीच ईश्वराने निर्माण केला इतक्या त्या तमाशाप्रधान
चित्रपटांशी एकरूप झाल्या. 'आई मला
नेसव शालू नवा,
फड सांभाळ तुऱ्याला गं आला, कसं काय पाटील बरं हाय का…' अशा शेकडो लावण्या त्यांच्या आवाजाने अजरामर केल्या. अभंग गावेत अशा
तन्मयतेने व साधेपणाने त्या लावणी गात असत. 'पद्मश्री', संगीत नाटक अकादमीसह पुरस्कार त्यांना मिळाले. सुलोचनाबाई
म्हणजे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राच्या काsंदणातील तेजस्वी हिरा होत्या. तो हिरा आज निखळला आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.