महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांतील भाजप सरकारचे नाटक सुरू आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी
सांगलीतील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर
महाराष्ट्रातील भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाव्याची खिल्ली
उडवली.
सीमाप्रश्न
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी
महाराष्ट्राचे लचके तोडण्याची भाषा केल्याने हा वाद चिघळला आहे.
बोम्मई आता काय म्हणाले?
देवेद्र
फडणवीस यांनी सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांचे स्वप्न कधीच
पूर्ण होणार नाही. राज्याचा भूभाग, जलसंपदा
आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती
जिल्ह्यांचा भाग सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे अशी
आमची मागणी आहे,
असे ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री
बोम्मई यांनी केले. 2004 पासून
महाराष्ट्राने सीमाप्रश्नावर खटला दाखल केला आहे. आतापर्यंत त्यांना यश आले नाही
आणि यापुढे येणार नाही, असेही
त्यांनी नमूद केले.
बोम्मई सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत -
फडणवीस
महाराष्ट्र-कर्नाटक
सीमाप्रश्नावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुराव्यांसह गेलो आहोत. सर्वोच्च
न्यायालय यावर निर्णय घेईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा
मोठे नाहीत, असे प्रत्युत्तर आज उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बेळगाव, निपाणी व
कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही न्यायालयात
मांडली आहे. कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. यात कोणीही राजकारण आणू नये.
आजपर्यंत पक्षाचा वाद सीमावादात आणला गेला नाही. ते यापुढेही पाळले जावे, असे सांगताना सीमा भागासाठीचा महाराष्ट्राचा लढा सुरूच राहील, असे फडणवीस म्हणाले. त्याआधी महाराष्ट्रातील एकही गाव
कर्नाटकात जाणार नाही, असे
फडणवीसांनी सांगितले होते.