Type Here to Get Search Results !

गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी! मिंधे फडणवीस सरकार नावाला जागले; एक दिवसाची भरपगारी रजा

 


हाराष्ट्रातले मिंधे फडणवीसांचे सरकार नावाला जागले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिंध्यांचे गुजरात प्रेम पुन्हा एकदा उफाळून आले असून गुजरातच्या मतदानासाठी महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय मिंधे सरकारने घेतला आहे.

कर्मचाऱ्यांना ही भरपगारी रजा दिली जाणार आहे.

गुजरात विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यामुळे तेथील निवडणूक यंत्रणा सध्या तयारीत व्यस्त असताना महाराष्ट्र सरकारही त्यात मागे नाही. 'निवडणूक गुजरातमध्ये आणि लगीनघाई महाराष्ट्रात' अशीच काहीशी मिंधे सरकारची गत झाली आहे. त्यातून महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातमधील मतदारांना मतदानासाठी सुट्टी जाहीर केली गेली आहे.

गुजरातमधील अनेक नागरिक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांत राहतात किंवा ये-जा करतात. यापैकी अनेकांची नावे गुजरातच्या मतदार यादीत आहेत. त्यांना मतदान करता यावे म्हणून 1 आणि 5 डिसेंबर अशी दोन दिवस सुट्टी जाहीर केली गेली आहे.

गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिह्यांसाठी हा सुट्टीचा आदेश लागू असणार आहे. मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा दोन तासांची सवलत दिली जाते. ज्या राज्यात निवडणूक असेल तेथील सरकार हा निर्णय घेते. मात्र शेजारच्या राज्यातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतल्याने त्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

आदेश पाळला नाही तर कारवाई

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा आदेश काढल्याचा दावा करण्यात येत आहे. हा आदेश मोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही बजावण्यात आले आहे.राज्याच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून हे आदेश जारी झाले आहेत. खासगी कंपन्या, संस्था आणि अन्य आस्थापनांना यानुसार संबंधित दिवशी गुजरातमध्ये मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्यावी लागणार आहे.

गुजरात प्रेमाचे भरते

शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गट गुजरातच्या आश्रयाला गेला होता. तिथून गुवाहाटीमार्गे गोव्याला पोहचून नंतर कमळाबाईसोबत सत्तेचा संसार थाटण्यात आला. तिथून मिंध्यांचे गुजरात प्रेम सातत्याने उफाळून येत आहे. खाल्ल्या मिठाला जागत आधीच मिंधे सरकारने महाराष्ट्रात होऊ घातलेले अनेक प्रकल्प गुजरातच्या घशात घातले आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गुजरातला खूश केले आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies