Type Here to Get Search Results !

पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून तरुणाचा निर्घृण खून

 


चाकण शहराच्या मध्यवस्तीत रात्रीच्या वेळी १० ते १२ जणांच्या टोळक्याने कोयत्याने दोघांवर हल्ला केला यात एक जण जागीच ठार झाला. जुन्या भांडणाच्या वादातून सदरची थरारक घटना सोमवारी (दि.

२१) रात्री साडेअकराचे सुमारास चाकण ( ता. खेड ) येथील नेहरू चौक परिसरातील अजित पतसंस्था कार्यालयाच्या समोरील भागात घडली आहे.

मोन्या उर्फ मोनेश संजय घोगरे ( वय २१ वर्षे, रा. चाकण ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र अमोल विश्वनाथ लाटुकर (रा. चाकण ) हा जखमी झाला आहे. अमोल लाटूकर याच्या फिर्यादीवरून १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चाकण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोनेश घोगरे व त्याचा मित्र अमोल सोमवारी रात्री आकाराचे सुमारास घरी जात असताना तीन दुचाक्यांवरून आलेल्या १० ते १२ जणांनी मोनेश याच्यावर कोयात्यांनी सपासप वार करण्यास सुरुवात केली. कपाळावर आणि डोक्यात पाठीमागील बाजूस कोयत्याने वार करण्यात आल्याने मोनेश जागेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा मित्र अमोल हा पळून जात असताना त्याच्यावर पाठीमागील बाजूने वार करण्यात आले. हल्लेखोरांच्या तावडीतून निसटलेल्या अमोल याने थेट चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मोनेश याचा मृतदेह प्रथम चाकण ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनेश घोगरे च्या कपाळावर, डोक्यावर व इतर ठिकाणी वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मोनेश घोगरे ह्याला 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याची तडिपारी दीड महिन्यापूर्वी संपलेली होती. त्यानंतर तो चाकण मध्ये आला होता. मात्र पूर्वीच्या वादातून चाकण खंडोबामाळ येथील युवकांच्या टोळीने त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान मागील महिन्यातच चाकण मध्ये याच टोळीतील गुन्हेगारांनी वर्षापूर्वी झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी एकाचा खून केला होता. मागील काही वर्षांपासून एका खुनाचा बदला घेण्यासाठी दुसरा खून करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. अजूनही टोळ्यांमधील तरुण एकमेकांना खुनाची धमकी देत आहेत. यावरून एकापाठोपाठ दुसरा खून करण्याचे धाडस गुन्हेगारांच्या मध्ये निर्माणच कसे होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या टोळ्यांची दहशत मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

हल्ल्यात कोयत्यांचा सर्रास वापर
कोयता सहजरित्या उपलब्ध होत असल्याने चाकण मध्ये मागील काही दिवसांत झालेल्या खुनांच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यातच टोळक्याने चाकण रोहकल रस्त्यावर कोयत्याने वार करीत खून केला होता. अनेक खुनी हल्ले आणि खुनाच्या घटनांमध्ये सर्रास कोयते वापरले जात आहे. कोयत्याच्या धाकाने लुटण्यासह हाणामारीतही कोयत्याचा वापर केला जातो. सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने कोयत्यांचा हल्ल्यातील वापर या भागात वाढला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies