Type Here to Get Search Results !

आगीने हादरली 'श्रावणधारा'! पुण्यातील कोथरूडमधील सोसायटीतील घटना;रहिवाशांमध्ये घबराट

 


पुणे/कोथरूड, दि. 17 -आगीपाठोपाठ झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने कोथरूडमधील श्रावणधारा सोसायटी गुरुवारी सकाळी हादरली.

सोसायटीत आग लागल्याने 15 मजली असलेल्या या इमारतीमध्ये धुराचा लोट पसरला.

त्यामुळे नागरिक घाबरुन इमारतीबाहेर आले. अग्निशमनदलाला आगीची वर्दी मिळताच कोथरूड आणि एरंडवणा केंद्राच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. धुरामध्ये अडकलेल्या 14 हून अधिक नागरिकांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले आणि पाण्याचे फवारे मारून पाऊण तासात आग आटोक्‍यात आणली.

कोथरूड परिसरातील बंधाई स्वीट चौकात श्रावणधारा सोसायटी आहे. ही इमारत 15 मजली असून, सकाळी साडेदहा वाजता इमारतीमधून धुरंचे लोट येऊ लागले. याबाबत तत्काळ अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली असता, कोथरूड आणि एरंडवणा केंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आग पहिल्या मजल्यापासून 14 व्या मजल्यापर्यंत गेली होती. त्यामुळे अन्य केंद्राच्या गाड्याही बोलविण्यात आल्या. यावेळी वारजे, सिहंगड, कात्रज आणि पीएमआरडीएच्या गाडी, दोन टॅंकर आणि दोन ब्रॉन्टोच्या मदतीने पाऊण तासात आग आटोक्‍यात आणली. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, गजानन पाथ्रुडकर, राजेश जगताप, प्रभाकर उम्राटकर व तांडेल अंगत लिपाणे, बाबू शितकल, अतुल डगळे, प्रवीण रणदिवे, किशोर बने यांनी ही आग आटोक्‍यात आणली.

सिलिंडर वेळीच बाहेर काढले
आगीबरोबरच संपूर्ण इमारतीमध्ये धुर पसरल्यामुळे अंधार झाला. नागरिकांना गुदमरायला लागले. त्यामुळे जवानांनी तत्काळ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणले. यावेळी चौदाव्या मजल्यावर आजारी व्यक्तीला जवानांनी खाली आणले. तसेच सहाव्या मजल्यावरील डक्‍टमधून चार सिलिंडर बाहेर काढल्यामुळे दुर्घटना टळली.
अग्निशमन यंत्रणा बंद
आग लागल्यानंतर पंधरा मजली इमारतीमध्ये लावण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, ती बंद असल्याचे निदर्शनास आले. यावेळी एका सिलिंडरचा स्फोट झाल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.

उंच इमारतीमध्ये देण्यात आलेली स्थायी अग्निशमन यंत्रणा ही सुरक्षिततेसाठी असून ती योग्य कार्यान्वित राहील, याची तेथे राहणाऱ्या नागरिकांनी वेळोवेळी पाहणी करणे आवश्‍यक आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies