Type Here to Get Search Results !

अस्पृश्यता अन् जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा फुले; जाणून घ्या त्यांच्याविषयी महत्वाचं

 


सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक महात्मा जोतिराव फुले यांचा आज स्मृतिदिन. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेलं कार्य फार मोठं आहे.

महाराष्ट्रासह देशातील समाजसुधारणेच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतीराव फुले. महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणांची चळवळ उभारताना उद्योग क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. महात्मा फुले यांनी एक प्रकारे सामाजिक सुधारणांची चळवळ चालवताना दुसरीकडे देश उभारणीचे ही कार्य केले. 11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेल्या महात्मा फुलेंनी आपलं अख्खं आयुष्य समाजसेवेसाठी वाहिलं. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला.

जाणून घेऊयात महात्मा फुले यांच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी:

- शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून मुलींसह सर्व शोषित घटकांना शिक्षण मिळायला हवे अशी त्यांनी सातत्याने मागणी केली. एक जानेवारी 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण दिले. सावित्रीबाई फुले या मुलींच्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांच्यासह फातिमा शेख यांनीदेखील मुलींच्या शिक्षणात वाटा उचलला.

- महात्मा फुले यांनी 1882 मध्ये हंटर आयोगाकडे सर्वांना प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी केली. अशी मागणी करणारे ते देशातील पहिले समाजसुधारक होते. त्याशिवाय अस्पृश्य समाजातील वस्त्यांमध्ये अधिकाधिक शाळा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. शिक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची असावी असेही त्यांनी सुचवले.

- समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी यावर भाष्य करणारे 'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ लिहीला. समाज प्रबोधन आणि परिवर्तनवादी चळवळीसाठी हा महत्त्वाचा ग्रंथ ठरला.

- महात्मा फुले यांनी विधवांच्या हक्कासाठी संघर्ष केला. 1860 मध्ये विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आणि 1865 मध्ये विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्याआधी त्यांनी 1864 मध्ये विधवा विवाह घडवून आणला.

- महात्मा जोतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सामाजिक विषमता नष्ट करणे, सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहचवणे आदी सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. वर्णव्यवस्थेला आणि वेदांना झुगारत सत्यशोधक समाजाने काम सुरू केले.

- महात्मा फुले यांनी 1855 मध्ये तृतीय रत्न हे नाटक लिहीले. हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक असल्याचे म्हटले जाते. सनातनी धर्माच्यााआधारे अशिक्षित, अस्पृश्य समाजाची फसवणूक कशी करतात यावर हे नाटक आधारले असल्याचे म्हटले जाते. परिवर्तनवादी चळवळ परिणामकारक करण्यासाठी नाटकाच्या रंगमंचाचा आधार महात्मा फुले यांनी घेतला असावा.

- महात्मा फुले हे 'पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी'चे (Pune commercial & contracting Company) कार्यकारी संचालक होते अशी माहिती प्रा. हरी नरके देतात. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा ही कामे महात्मा फुले यांच्या कंपनीने केली आहेत.

- महात्मा फुले यांच्या कंपनीचे भागिदार किंवा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेल्या व्यक्तिंनी बांधकाम क्षेत्रावर आपला ठसा उमटवला आहे. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे केली असल्याचे प्रा. हरी नरके यांनी त्यांच्या एका लेखात सांगितले.

- भारतातील पहिली कामगार संघटना 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. त्यांना कामगार संघटना स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन महात्मा फुले यांनी केले.

- महात्मा फुले यांनी 1875 मध्ये शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात खतफोडीचे बंड घडवून आणले.

- 1888 मध्ये मुंबईत जोतीराव फुले यांचा रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि महात्मा ही पदवी देण्यात आली.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies