ऊसाच्या ट्रॅक्टरने डिझेल टँकरला धडक दिल्याने आग; सात वाहनं जळून खाक, जीवितहानी झाल्याची भीती

  


लातूरमध्ये झालेल्या एका अपघातात सात वाहनं (Vehicles) जळून खाक झाली आहेत.

भातखेडा इथल्या मांजरा नदीच्या पुलाच्या पुढे ही घटना घडली. सुरुवातीला लातूर शहरातून उदगीरकडे जाणाऱ्या डिझेल टँकरला ऊसाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यामुळे डिझेल टँकरला आग लागली. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केलं आणि यात सात वाहन जळून खाक झाली आहेत. दरम्यान या घटनेत किती लोक जखमी झाले, किती लोक भाजले याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील पाच पोलीस पथकं घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूर-उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. लातूर शहरातून उदगीरकडे जाणाऱ्या वाहनाचा मार्ग बदलण्यात आला आहे.

सात वाहनांचा कोळसा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 च्या विस्तारीकरणाचं काम सुरु आहे. यामुळे वळण रस्त्यावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याच अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला. यामुळे कमी जागेत जवळ आलेली वाहनं एकापाठोपाठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या वाहनांमध्ये ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर, डिझेलचा टँकर, दोन कार, कापसाची वाहतूक करणारा मोठा ट्रक, एसटी महामंडाळाची बस आणि ट्रॅक्टरचे हेड ट्रॉली नसलेले वाहन यांचा समावेश आहे.

आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाची दमछाक
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बाजूलाच असलेल्या मांजरा नदीपात्रातून पाण्याची सोय करण्यात आल्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात यश आलं. डिझेल टँकरला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानाची चांगलीच दमछाक झाली होती. त्यातच कापसाच्या गाठी वाहतूक करणारा ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागला. एसटी महामंडळची बस आणि दोन कार जागेवर जळून खाक झाल्या.

अपघातातील लोक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली. तीन अग्निशमन दलाच्या गाड्या, पाच रुग्णवाहिका आणि मोठ्या प्रमाणात हजर असलेल्या पोलिसांनी पुढील हानी टाळण्यासाठी प्रयत्न केले. डिझेल टँकरची आग विझली असली तरी त्यात केव्हाही स्फोट होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात असल्यामुळे सर्व खबरदारी घेतली जात आहे. या घटनेतील किती लोक जखमी आहेत किंवा मृतांचा आकडा अद्याप समजू शकत नाही. प्रथम दक्षता म्हणून आम्ही यातील लोकांना तात्काळ उपचारासाठी पुढे पाठवलं आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी दिली आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..