हिंगोली, 28 नोव्हेंबर : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. यातच आता हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
वडिलांच्या नावे असलेले 70 हजारांचे कर्ज कसे फिटेल या
चिंतेत असल्याने एका तरुणाने आत्महत्या केली. स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीचे
स्टेटस ठेवून तरुणाने गळफास घेत आपले जीवन संपविले. काय आहे संपूर्ण प्रकरण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील कारेगाव
शिवारात काल रविवारी ही घटना उघडकीस आली. नवल जयराम नायकवाल (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे
नाव आहे.
याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील जयराम
नायकवाल यांचे कारेगाव शिवारात पाच एकर शेत आहे. या शेतात सोयाबीन व इतर पिके
घेण्यात आली. मात्र, अतिवृष्टीमुळे तसेच सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.
त्यामुळे पेरणीसाठी घेतलेले 70 हजार रुपयांचे कर्ज फेडण्याचा
प्रश्न निर्माण झाला होता. हमाली काम करुन कर्ज फेडण्याचा प्रयत्न - नवल नायकवाल याने वडिलांचे कर्ज
फेडण्यासाठी गावात हमाली काम केले. मात्र, कर्ज फिटण्यास मोठा कालावधी
लागणार असल्याने नवल तणावात होता. अखेर हमालीचे काम करण्यासाठी जातो, असे सांगून तो शनिवारी सायंकाळी
घराबाहेर पडला.
या वेळी त्याने स्वतःच्या
स्टेटसवर 'नवल भावपूर्ण श्रद्धांजली' असे लिहिले. तर 'साईमंदिराच्या मागे' असेही स्टेटसवर लिहिले. मात्र, असं त्याने नेमकं का लिहिलं हे
त्याच्या कुटुंबीयांना समजले नाही अखेर रविवारी सकाळी नवलचा मृतदेह साई मंदिराच्या मागे असलेल्या
झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस
ठाण्याचे निरीक्षक रणजित भोईटे, जमादार अनिल भारती, चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी जयराम नायकवाल
यांनी दिलेल्या माहितीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.