पोलिस असल्याचे भासवून नीरेत दागिने लुटले.
व्यापाऱ्याचे तीन तोळे सोने केले लंपास
नीरा :
नीरा (ता.पुरंदर) येथे पोलिस असल्याचा बनाव करून भररस्त्यात जेष्ठ व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाम रामचंद्र सोनी (वय ७३) यांची सोन्याची एक चैन व एक अंगठी असे तीन तोळे सोने लंपास करुन चोरांनी पोबारा केला आहे. याबाबत सोनी यांनी जेजूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
याबाबतीत जेजूरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शाम सोनी हे शनिवार दि. ३० जुलै रोजी दुपारी ०३:१५ च्या सुमारास रहदारी असलेल्या पालखी महामार्गावरील नीरा रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल जवळ चालत होते. त्याचवेळी एका अनोळखी इसमाने मोटरसायकल वरून येऊन पोलीस असल्याचा बहाना करत ओळखपत्र दाखविले. फिर्यादी यांना म्हणाला की या ठिकाणी चोऱ्या होतात, आम्ही तपासणी करीत आहोत. तुम्ही तुमचे हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चैन माझे ताब्यात द्या. असे म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील अंगठी व गळ्यातील चैन त्या इसमाचे ताब्यात दिली असता त्याने चैन व अंगठी रुमालामध्ये ठेवून सोनी यांच्याकडे दिली व तो पालखी मार्गावरुन लोणंद बाजुकडे मोटरसायकल वरुन निघून गेला. त्यानंतर सोनी यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यात ठेवलेली सोन्याची चैन आणि अंगठी दिसली नाही.
त्यामुळे सोनी यांची खात्री झाली की अनोळखी इसम थांबून त्यांचा विश्वास संपादन करून पोलीस असल्याचे खोटे सांगून अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन व अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ८५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. याबाबत जेजुरी पोलीसांत गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र भापकर करीत आहेत.