नीरा पालखीतळा समोरील रस्त्याचे काम सुरू: आता खड्डा बुजणार
पालखी सोहळ्या पूर्वी काम पूर्ण करण्याचे उपसरपंच राजेश काकडे यांचे आश्वासन
नीरा दि.१०
नीरा येथील पालखीतळा समोरील रस्ता नव्याने करण्याच्या कामाला आज पासून सुरवात करण्यात आली आहे. नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांच्या उपस्थितीत आज दि.१० रोजी या कामाला सुरवात करण्यात आली.या रस्त्यावर पाणी साचत असल्याने वारकऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत असे. अनेक वर्ष हा रस्ता दुरुस्त होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा विसावा असलेल्या नीरा येथील पालखीतळा समोर दर वर्षी मोठा खड्डा पडलेला असतो. हा खड्डा कायम स्वरुपी बुजविण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली होती. वृत्तपत्रे आणि माध्यमांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख
यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर आज दिनांक १० जून रोजी या रस्त्याचे काम उपसरपंच राजेश काकडे व ग्रामसेवक मनोज ढेरे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. हे काम पालखी सोहळा येण्या पूर्वी हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जाईल. असे उपसरपंच राजेश काकडे यांनी म्हटल आहे.त्याच बरोबर या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांनी आमदार संजय जगताप व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.दरम्यान घाई घाई मध्ये हे काम निकृष्ट दर्जाचे होऊ नये असे नागरिकांनी म्हटले आहे.